हैदराबाद : देशात भारत बायोेटेक या स्वदेशी कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेेकडून मान्यता मिळू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केला. या सर्व अडथळ्यांवर मात करून कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून नोव्हेंबर महिन्यात मान्यता मिळाली, असे ते म्हणाले.
रामिनेनी फाउंडेशनतर्फे हैदराबादमध्ये आयोजिलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. एन. व्ही. रमणा म्हणाले की, फायझरसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातील काही लोकांशी हातमिळवणी केली व कोव्हॅक्सिनला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कोव्हॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीचे प्रमुख कृष्णा एला व सुचित्रा एला यांना रमणा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ते म्हणाले की, भारत बायोटेक कंपनीने खूप मेहनत घेऊन कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस तयार केली आहे. कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळावी म्हणून भारत बायोटेकने १९ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता. केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेत कोविशिल्डबरोबर कोव्हॅक्सिनचाही समावेश केला आहे. मात्र या लसीला संघटना लवकर मान्यता देत नव्हती.