नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या मजुरांना आणि कामगारांना बसला आहे. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल झाले. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात रस्त्यावर विक्री करण्यास काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र त्यातही काही ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती विक्रेत्यांना लुटत असल्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी दिल्लीत असाच प्रकार घडला. दिल्लीच्या जगतपुरी भागात छोटे नावाचा एक जण आंबे विकत होता. आंबे जास्त असल्यामुळे त्यानं काही पेट्या रस्त्याच्या कडेला ठेवल्या होत्या. जवळच वाद झाल्यानं काही जण आले आणि त्यांना छोटेला त्याची आंब्यांची गाडी पुढे नेण्यास सांगितली. छोटे काही अंतर पुढे गेला. आंब्यांच्या पेट्यांजवळ विक्रेता नसल्याचं पाहत रस्त्यावरुन जाणारे अनेकजण धावत पेट्यांजवळ आले. त्यांनी शक्य तितके आंबे हातात घेतले. काहींनी आंबे खिशात, पिशवीत भरले आणि तिथून निसटले. काहींनी तर रिक्षा, सायकल, दुचाकीवरुन उतरून आंबे पळवले.
VIDEO: ...अन् सर्वसामान्यांनी बघता बघता फेरीवाल्याचे ३० हजारांचे आंबे लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 9:24 PM