भटिंडा: अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या रेल्वेअपघाताच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत. त्या दुर्घटनेत 61 जणांनी जीव गमावला होता. मात्र त्यानंतरही सर्वसामान्य लोक कोणताही बोध घेत नाहीत. भटिंडामध्ये छठ पूजा साजरी करताना याचा प्रत्यय आला आहे. शेकडो लोक छठपूजा करण्यासाठी रेल्वे रुळांवर आले होते. विशेष म्हणजे हे सर्व लोक एका पुलावर उभे होते. त्यामुळे जर ट्रेन आली असती, तर अनेकांना बाजूलाही होता आलं नसतं. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. भटिंडात छठ पूजा साजरी करण्यासाठी शेकडो लोक रेल्वे रुळांवर उभे होते. रुळांखालून सरहिंद कालवा जात असल्यानं या भागात मोठी गर्दी झाली होती. शेकडो महिला, मुलं, पुरुष रुळांवर उभे होते. यावेळी रेल्वे आणि पोलिसांनी लोकांना रुळांवरुन हटण्याची सूचना केली. यासाठी रेल्वेनं अनेकदा घोषणादेखील केल्या. मात्र तरीही गर्दी रुळांवरुन बाजूला झाली नाही. याचवेळी एखादी ट्रेन आली असती, तर अमृतसर रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती झाली असती. मात्र सुदैवानं यावेळी कोणतीही ट्रेन आली नाही. ज्या रेल्वे रुळांवर शेकडो लोक छठ पूजेसाठी जमा झाले होते, तिथून दररोज 15 लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अमृतसर दुर्घटनेतून बोध नाहीच; छठ पुजेसाठी शेकडो लोक रेल्वे ट्रॅकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 1:40 PM