मुंबई: पश्चिम बंगालमधील उच्चभ्रू बुद्धिवंतांप्रमाणे महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रात परखड विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींची हत्या झाली, असे मत ज्येष्ठ गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी व्यक्त केले. 'द वॉल' ला दिलेल्या मुलाखतीत गुलजार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येसंदर्भात भाष्य केले. गुलजार यांनी पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतील विचारवंतांच्या मानसिकतेवर बोट ठेवले. पश्चिम बंगालमध्ये एखादी घटना घडल्यानंतर तेथील विचारवंत त्यावर व्यक्त होतात. त्याला प्रादेशिक प्रसारमाध्यमेही प्रसिद्धी देतात. त्यामुळे राज्यातील जनतेला या विचारवंताविषयी माहिती असते. मात्र, महाराष्ट्रातील लोक एखाद्या घटनेनंतर फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असताना कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्यासारखे विचारवंत परखडपणे बोलतात. प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. हे सहन न झाल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे गुलजार यांनी सांगितले.
याशिवाय गुलजार यांनी म्हटले की, गेल्या काही वर्षांत मुंबईतील बुद्धिवंतांच्या मानसिकतेत फरक पडला आहे. सध्या मुंबईतील विशिष्ट वर्ग इंग्रजी वर्तमानपत्रे किंवा नियतकालिके वाचतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथील वर्तमानपत्रांमध्ये मुख्यत: व्यापाराशी आणि जाहिरातींशी निगडीत मजकूर असतो. त्यामुळे इतर बातम्यांना वर्तमानपत्रांमध्ये क्वचितच स्थान मिळते. याउलट मराठी आणि हिंदीतील प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये जनआंदोलनाच्या बातम्या छापून येत असतात. मात्र, बहुतांश लोक ही वर्तमानपत्रे वाचतच नसल्यामुळे त्यांना या घटनांबद्दल माहितीच नसते, असे गुलजार यांनी म्हटले.