यूक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी एअर इंडियाच्या प्रवासी विमानांचा वापर करण्यात येत असून यासाठी दरतासासाठीचा ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती समोर आली आहे. रशियाकडून युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करण्यात आल्यानंतर तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. यात भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी जास्त प्रवासी क्षमता असलेल्या ड्रीमलाइनर विमानांचा वापर करण्यात येत आहे.
युद्धग्रस्त युक्रेनचे शेजारी देश असलेल्या रोमानिया आणि हंगेरीच्या विमानतळांवर भारतीय विमानं उतरत आहेत. या विमानतळांवर पोहोचलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशात आणण्याचं काम केलं जात आहे. आतापर्यंत शेकडो भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्याचं काम करण्यात आलं आहे. युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेच्या मोहिमेचं संचलन भारत सरकारच्या निर्देशानुसार केलं जात आहे.
एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत या मोहिमेसाठी होत असलेल्या खर्चाची माहिती दिली आहे. युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ड्रीमलाइनर विमानांच्या उड्डाणावर प्रतितास सात ते आठ लाख रुपये इतका खर्च येत आहे. बचाव कार्यासाठी विमान कुठे जात आहे आणि अंतर किती आहे यावर संपूर्ण खर्च अवलंबून आहे, असंही ते म्हणाले.
आतापर्यंत १.१० कोटींहून अधिक खर्चभारतातून युक्रेनच्या जवळ जाण्यासाठी आणि तेथून भारतीय नागरिकांसह परतण्याच्या मोहिमेसाठी १.१० कोटींहून अधिक रक्कम खर्च केली जात आहे. एकूण खर्चामध्ये विमानाचे इंधन, क्रू मेंबर्सचे मानधन, नेव्हिगेशन, लँडिंग आणि पार्किंग शुल्क यांचा समावेश होतो. मोहिमेला लागणारा बराच वेळ लक्षात घेता ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टाफचे दोन गट ठेवण्यात आले आहेत. पहिला गट विमानाला गंतव्यस्थानावर घेऊन जातो आणि नंतर परतीच्या फ्लाइटमध्ये दुसरा गट ताब्यात घेतो, अशी माहिती सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
सध्या, एअर इंडिया या बचाव कार्याचा एक भाग म्हणून रोमानियन शहर बुखारेस्ट आणि हंगेरीच्या बुडापेस्टसाठी उड्डाणं होत आहेत. एअरलाइनने या दोन्ही गंतव्यस्थानांसाठी कोणतीही हवाई सेवा सूचित केलेली नाही.
नागरिकांवर कोणतीही शुल्क आकारणी नाही'फ्लाइट अवेअर' या वेबसाइटनुसार, बुखारेस्ट ते मुंबई या फ्लाइटला सहा तास लागतात. त्याचप्रमाणे बुखारेस्ट ते दिल्ली हा प्रवासही सहा तासांचा झाला आहे. मात्र, प्रवासाचा वेळ वाढल्याने बचाव कार्याचा खर्च वाढेल. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या या बचाव मोहिमेसाठी सरकार कोणतेही शुल्क आकारत नाही. त्याच वेळी, काही राज्य सरकारांनी देखील घोषणा केली आहे की ते त्यांच्या राज्यांतील रहिवाशांना युक्रेनमधून आणण्याचा खर्च उचलतील. बचाव कार्य संपल्यानंतर, संपूर्ण खर्चाची गणना केली जाईल आणि त्याचे संपूर्ण बिल केंद्र सरकारकडे पेमेंटसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या मोहिमेत वापरण्यात येणाऱ्या ड्रीमलायनर विमानात २५० हून अधिक आसनक्षमता आहे. ड्रीमलायनर विमान ताशी पाच टन इतके इंधन वापरते.