-संजय शर्मा नवी दिल्ली : भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील एका मोठ्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पाला जी-२० परिषदेत मंजुरी मिळू शकते. मध्य आशियातील देशांना रेल्वेने जोडण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मध्य आशियातील देशांना रेल्वे आणि बंदरांच्या माध्यमातून जोडण्यासाठी बहुराष्ट्रीय बंदर आणि रेल्वे कराराला नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० देशांच्या दोन दिवसीय परिषदेत मंजुरी मिळू शकते.
भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात होणाऱ्या या करारामुळे मध्य आशियादरम्यान प्रवास करणाऱ्या अनेक देशांना त्याचा फायदा होणार आहे. भारत या प्रकल्पात सौदी अरेबियाला बंदराच्या माध्यमातून जोडणार आहे. या प्रकल्पाला अमेरिका तांत्रिक व आर्थिक मदत करणार आहे. हा प्रकल्प जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी देश या प्रकल्पात सामील होतील. इस्रायल आणि जॉर्डनसारखे देशही या रेल्वे प्रकल्पात नंतर सामील होऊ शकतात, तर भारताप्रमाणेच तुर्कस्तानलाही बंदराच्या माध्यमातून या प्रकल्पात समाविष्ट करता येईल.
जी-२० परिषदेतच या महत्त्वाच्या प्रकल्पांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या उभारणीमुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल, डिझेलची बचत होईल. याचा फायदा ग्राहकांना होईल. यामुळे व्यवसायाचा मार्ग सुकर, जलद आणि कमी खर्चिक होईल.