Raghav Chadha in Rajya Sabha : केंद्र सरकारने 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता संसदेत त्यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज राज्यसभेतील चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी भाजपवर बोचरी टीका केली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमी झालेल्या जागांवर बोलताना ते म्हणाले की, देशातील जनतेने भाजपच्या जागांवर 18 टक्के जीएसटी लावला आणि पक्षाची संख्या 240 वर आणली.
यावेळी राघव यांनी वस्तू आणि सेवा करात (GST) सुधारणा, पुनरावलोकन आणि सुलभीकरण सुचवले. तसेच, जीएसटीचे 'गब्बर सिंग टॅक्स' असे वर्णन करत म्हणाले की, 2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या. पण, यंदा या देशातील जनतेने भाजपच्या जागांवर जागांवर 18% GST लावला आणि संख्या 240 वर आणली. आपल्या भाषणात राघव चढ्ढा यांनी ग्रामीण भागातील वाढती महागाई, घसरलेले ग्रामीण उत्पन्न, अन्नधान्याची वाढती महागाई आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवर भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
घसरलेले ग्रामीण उत्पन्न आणि वाढत्या महागाईवरुन सरकारवर टीका करताना चढ्ढा म्हणाले की, 2023-24 या आर्थिक वर्षात ग्रामीण उत्पन्नाची वाढ दशकाच्या नीचांकावर आहे आणि वास्तविक ग्रामीण वेतनात गेल्या 25 महिन्यांत सातत्याने घट झाली आहे. आज परिस्थिती अशी आहे की, 2014 मध्ये 3 किलो डाळ विकत घेणारा मजूर आज तीच डाळ फक्त 1.5 किलो खरेदी करू शकतो.
ते पुढे म्हणाले, आज आपण भारतात ब्रिटनप्रमाणे कर भरत आहोत आणि सोमालियासारख्या सेवा मिळत आहेत. अन्नधान्य महागाई 9 ते 9.5% दरम्यान आहे. ज्या वस्तूंवर आपण स्वावलंबी होतो आणि ज्यांची निर्यातही करत होतो, त्या वस्तूंमध्येही आपण महागाईचा अनुभव घेत आहोत. 2014 मध्ये एक किलो गव्हाची किंमत 21 रुपये होती, ती 2024 मध्ये वाढून 42 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. ही परिस्थिती वाढती महागाई आणि घसरलेल्या वेतनाचा परिणाम आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.