नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुसही समोर आली. काही नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते. तर काहींनी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरही टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर टीका केली.
"गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात पक्षाची कामगिरी चांगली झालेली नाही हे सर्वांनाच माहित आहे," असं चिदंबरम म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणुकीतील पराभवासाठी गांधी कुटुंबीयांना जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, असंही म्हटलं. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी पक्षाची पुनर्बांधणी आणि दुसरा निवडणूक लढवणं ही दोन कामं करण्याचे प्रयत्न केले. ही दोन्ही कामं एकाच वेळी होऊ शकत नाही असा इशारा मी त्यांना आधीच दिला होता. पक्षाची पुनर्बांधणी आधी व्हायला हवी आणि निवडणुकांमध्ये जाणं नंतरही होऊ शकतं. परंतु दुर्देवानं पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाच वेळी झाली," असं ते म्हणाले.
अनेक गंभीर उणीवा"पक्षात अनेक गंभीर उणीवा आहेत. ज्या कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या इतरांनी निदर्शनास आणल्या आहेत. यासाठी आम्हाला संघटनान्मक उणीवा दूर करणं आवश्यक आहे," असं चिदंबरम म्हणाले. गांधी कुटुंबीयांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. आपण गोव्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि अन्य लोकांनीही त्यांच्या राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात सातत्यानं काँग्रेसची कामगिरी घसरत आहे. १९८९ नंतर काँग्रेसनं शासन न केलेलं एक राज्य आहे. यावेळीही काँग्रेसला उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी करता आली नाही. २०१७ मध्ये काँग्रेसला या ठिकाणी ७ जागांवर विजय मिळाला होता. परंतु यावेळी त्यातील पाच जागा गमवाव्या लागल्या. तर पक्षाचा व्होट शेअर २.४ टक्क्यांवर आला आहे.