मंदिराचा मुद्दा असो किंवा काश्मिरी पंडितांसाठी आवाज उठवण्याची संधी असो, तुरुंगात जाण्यास सदैव तयार असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे सुरुवातीचे आयुष्य खूप संघर्षमय होते, पण २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने भजनलाल शर्मा यांना पहिल्यांदाच संधी दिली आणि त्यांनी विजय मिळवला. एवढेच नाही तर मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होताच संपूर्ण देशाला आश्चर्य वाटले. ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि जयपूरमधील वरिष्ठ प्रतिनिधी जितेंद्र कुमार प्रधान यांनी देशातील निवडणुका, काँग्रेसचे आरोप आणि राजस्थानच्या विकासाविषयी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्याशी झालेल्या संवादाचा हा खास सारांश...
प्रश्न : २०१४ आणि २०१९ प्रमाणे २०२४ मध्येही राजस्थानमध्ये भाजपला २५ पैकी २५ जागा मिळतील का?
शर्मा - मी तुम्हाला खात्री देतो की राजस्थानमध्ये या वेळीही २५ पैकी २५ जागा भाजपला मिळणार आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे.
प्रश्न : विधानसभा निवडणुकीत प्रश्नपत्रिका फुटीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता, तुमचे सरकार सत्तेवर येताच एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. आता त्या परीक्षाच रद्द कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी काय रणनीती असेल? शर्मा - काँग्रेसच्या काळात १९पैकी१७ पेपर फुटले होते. निवडणुकीपूर्वी आम्ही आश्वासन दिले होते की आम्ही एसआयटी स्थापन करू आणि प्रकरणाची चौकशी करू. आम्ही एसआयटी स्थापन केली. आतापर्यंत सुमारे १०० लोकांना अटक झाली आहे, अजूनही अनेक पेपरविषयी तपास सुरू आहे.
प्रश्न : वसुंधरा राजे व अशोक गेहलोत यांची मिलीभगत होती, त्यामुळेच राजे यांना मुख्यमंत्री केले नाही व तुम्हाला त्या जागेवर बसवण्यात आले, असे म्हटले जात होते... यावर काय सांगाल?
शर्मा - काँग्रेसने ज्या प्रकारे भ्रष्टाचार केला आहे, काँग्रेस स्वत:ला तशीच समजते. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारे पूर्णपणे नियंत्रित आहेत.
प्रश्न : राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससह अन्य पक्षांतून भाजपमध्ये येण्यासाठी नेत्यांची जणू काही स्पर्धाच लागली होती. या बदलाकडे तुम्ही कसे बघता? सीबीआय व ईडीची त्यांना भीती असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
शर्मा - जेव्हा लोकांना अंधाराची जाणीव होते आणि जहाज बुडत आहे हे लक्षात येते तेव्हा ते जहाजातून उडी मारतात आणि पळून जातात. काँग्रेसचे जहाज बुडत आहे. स्वत:च्या कर्तृत्वाने काँग्रेसची ही दुरवस्था झाली आहे. काँग्रेसने नेहमीच देशाला लुटण्याचे काम केले, काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्यांची काळजी घेतली नाही, काँग्रेसने नेहमीच गरिबीचा नारा दिला, पण गरिबीशी त्यांना काही देणेघेणे नव्हते. त्यामुळे हे बुडणारे जहाज असल्याची लोकांची भावना होती. त्यामुळे ते पक्षाला सोडून इतर पक्षात गेले आणि आमच्या पक्षातही आले.
प्रश्न : तुमचा प्रचार दौरा फक्त राजस्थानातच नाही तर संपूर्ण देशात आहे. मुख्यमंत्री योगींनाही तितकी संधी दिली जात नाही. यामागे तुमची रणनीती काय आहे?
शर्मा - असे काही नाही, सगळे जात आहेत. मला एवढेच सांगायचे आहे की, राजस्थानातील नागरिक जे इतर राज्यांत गेले आहेत, संपूर्ण देशात गेलेले आहेत, ते जाणतात की ते आपल्या स्वाभिमानासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या महाराणा प्रतापांच्या भूमीतील आहेत. मी तुमच्या माध्यमातून देशभरातील राजस्थानी स्थलांतरितांना सांगू इच्छितो की, ते जिथे राहतात तिथे ते नेहमीच राष्ट्रवादाची जाणीव ठेवून, राजस्थानच्या मातीचा स्वाभिमान, शक्ती आणि भक्ती लक्षात घेऊन प्रामाणिकपणे काम करतात.
प्रश्न : भाजप चारशेचा टप्पा पार करणार असल्याचे वारंवार सांगत आहे, त्यामागे दोन गोष्टी आहेत, असा आरोप विरोधी पक्ष करत आहे. एक म्हणजे त्यांना राज्यघटना बदलायची आहे आणि दुसरे म्हणजे त्यांना आरक्षण हटवायचे आहे. यावर तुमचे काय मत आहे?
शर्मा - तुम्ही कोणतीही निवडणूक घ्या आणि बघा, देशात संभ्रम निर्माण करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. तुम्ही काँग्रेसचे शेवटचे पाच जाहीरनामे घ्या आणि त्यांनी निवडणुकीत किती आश्वासने दिली आणि किती पूर्ण केली ते पाहा. त्यांनी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्याबाबतीत काय केले हे देशातील जनतेला माहीत आहे. त्यांना तिकीटही दिले गेले नाही आणि त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा त्यांना हरवण्याचेही काम केले. त्यांना भारतरत्न का दिला नाही, हेच मला विचारायचे आहे. देशाची घटना कोणीही बदलू शकत नाही आणि आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही.
प्रश्न : २०२३ मध्ये तुम्ही पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली. ती निवडणूक जिंकली आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालात. अनेकदा म्हटले जाते की, तुम्ही भाग्यवान मुख्यमंत्री आहात. तुम्हाला याबद्दल काय वाटते?
शर्मा - मी संघटनेचा पूर्ण कार्यकर्ता आहे. युवा मोर्चाचा तालुका अध्यक्षपदापासून ते विद्यार्थी परिषदेपर्यंत काम केले. युवा मोर्चात काम करताना मी तीनदा संघटनेचा अध्यक्ष झालो. मी दोन वेळा पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो, त्यानंतर मी प्रदेश उपाध्यक्ष आणि सलग चार वेळा प्रदेशाध्यक्ष आणि चार वेळा सरचिटणीस होतो. कार्यकर्त्यांचे प्रेम, कार्यकर्त्यांचे संघटन, कार्यकर्त्यांशी माझा संवाद चांगला आहे, असे मी निश्चितपणे म्हणू शकतो. विधानसभेचे तिकीट मला पहिल्यांदाच मिळाले आणि मी पहिल्यांदाच जिंकलो हे खरे आहे.
त्यानंतर मी मुख्यमंत्रीपदासाठी बसलो होतो, पण जेव्हा माझे नाव पुकारले गेले तेव्हा मला ते नीटसे ऐकू आले नाही. माझे नाव पुकारले गेले असे मला वाटलेच नाही. पण, पुन्हा दुसऱ्यांदा नावाचा पुकारा झाला, तेव्हा माझी काय भावना झाली हे तुम्हाला कशी सांगू? त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची घोषणा केली तेव्हाच मलाही कळाले. हे फक्त भारतीय जनता पक्षात शक्य होऊ शकते, इतर कोणत्याही राजकीय पक्षात नाही. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करण्याचे काम पक्षाने केले आहे.
(लोकमत हिंदीच्या यूट्यूब चॅनेलवर पाहा सविस्तर मुलाखत)