नवी दिल्ली - देशातील 5 राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात आता चांगलीच रंगत आली आहे. आठ टप्प्यात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी २७ मार्चपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. (West Bengal Assembly Elections 2021) दरम्यान, मतदानाला आता काही काळ ऊरला असताना पश्चिम बंगलामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे चित्र दाखवणारे अजून एक ओपिनियन पोल समोर आले आहे. या ओपिनियन पोलमधून पश्चिम बंगालमध्ये भाजपा (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर तृणमूल काँग्रेसची दुसऱ्या क्रमांकावर घसगुंडी होण्याची शक्यता आहे. मात्र, दक्षिण भारतात भाजपला समर्थन नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भाजपा नेत्यानंच ही कबुली दिलीय.
केरळमध्ये 6 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. केरळमधून यंदा भाजपला मोठी आशा आहे, पण येथील ज्येष्ठ भाजप नेत्यानेच पक्षाला झटका दिलाय. केरळमधील भाजपा नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय. केरळ इतर प्रदेशांपेक्षा वेगळा आहे, येथील लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत.
हरयाणा आणि त्रिपुरा येथे पक्षाने आगेकूच केलीय, तर पश्चिम बंगालमध्येही कमी वेळेत भाजपाने रणनिती बनवलीय. मग, केरळमध्ये भाजपा सक्षम का ठरत नाही? असा प्रश्न राजगोपाल यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, केरळमध्ये भाजपला मोठं समर्थन न मिळण्यास दोन-तीन कारणं आहेत. केरळचा साक्षरता दर 90 टक्के आहे. येथील लोक विचार करतात, तर्क लावतात. शिक्षित लोकांची ही सवयच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये 55 टक्के हिंदू आहेत, आणि 45 टक्के अल्पसंख्यांक आहेत. प्रत्येक कॅल्क्युलेशनमध्ये ही बाबही येते. त्यातच, केरळची तुलना इतर कुठल्याही राज्यासोबत केली जाऊ शकत नाही. येथील परिस्थिती जरा वेगळीच आहे, पण आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, असे ओ राजगोपाल यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय.
राजगोपाल यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी लगेचच भाजपला लक्ष्य केलंय. शशी थरुर यांनी म्हटलं, माझे मित्र, माजी प्रतिस्पर्धी आणि भाजपा नेते राजगोपाल यांनी हे मान्य केलंय की, केरळमधील लोक भाजपाला मत देत नाहीत, कारण ते शिक्षित असून ते वैचारीक भूमिका घेतात. तर, काँग्रेसनेही अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत, राजगोपल यांचं विधान शेअर केलंय. तसेच, फक्त केरळच नाही, संपूर्ण देशच आता भाजपला मतदान करणार नाही, असे काँग्रेसने म्हटलंय.