चेन्नई : यंदा तीव्र पाणीटंचाईची झळ चेन्नईसारख्या महानगरालाही सोसावी लागत असून, तेथील अनेक रहिवासी शहर सोडून अन्यत्र राहायला गेले आहेत. जे सुट्टी घेऊन फिरायला गेले होते त्यांनी चेन्नईमध्ये परतणे लांबणीवर टाकले आहे.
चेन्नईला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही तलावांची पाणीपातळी खूपच घटली आहे. पाणी मिळत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. शहराच्या कोडम्बक्कम भागात वर्षानुवर्षे राहणारे अनेक जण नाईलाजास्तव के. के. नगरामध्ये राहायला गेले आहेत. तेथे दिवसभरात तीन तास पाणीपुरवठा होतो. पाणी येण्याच्या वेळेस घरात कोणी नसले तर त्यांची खूपच पंचाईत होते.
पेरूनगुडीचे रहिवासी एम. एस. श्रीकांत हे आपल्या कुटुंबासह दोन दिवस नातेवाईकांकडे राहायला गेले. त्यानंतर ते रेल्वे प्रवास करून बंगळुरूला बहिणीकडे गेले. ते काही सहलीला गेले नव्हते. श्रीकांत म्हणाले की, आम्ही जिथे राहतो तिथे दहा दिवस पाणीपुरवठाच झाला नव्हता. त्यामुळे दुसरीकडे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. पाणीटंचाईमुळे आता पुढचा मुक्काम कोणाकडे करायचा हा विचार त्यांचा मनात घोळत असतो. चेन्नईतील अनेक जण थेट केरळला नातेवाईकांकडे राहायला गेले होते.
१७ जिल्हे दुष्काळग्रस्तगेली दोन वर्षे झालेल्या पावसामुळे भूजल पातळी घटली आहे. चेन्नई, कांचीपुरम यांसह १७ जिल्हे दुष्काळग्रस्त असल्याचे राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले. या जिल्ह्यांत गेल्या वर्षी १९ ते ५६ टक्के इतकाच पाऊस पडला होता. एकीकडे पाण्याची टंचाई, तर कडक उन्हाळा यामुळे या जिल्ह्यातील लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी शहराची वाट धरली आहे.