मोदींच्या ‘मित्रों’ची लोकांना आता धास्ती!, काँग्रेसचा प्रतिहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:20 AM2017-11-06T03:20:19+5:302017-11-06T03:20:47+5:30
हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारात तोंडसुख घेणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने रविवारी प्रतिहल्ला चढविला आणि मोदींच्या भाषणांतील ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली असल्याचा टोला लगावला.
धर्मशाला : हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारात तोंडसुख घेणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने रविवारी प्रतिहल्ला चढविला आणि मोदींच्या भाषणांतील ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली असल्याचा टोला लगावला.
गुजरातमधील प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीएसटी’ची फोड ‘गब्बर सिंग टॅक्स’ अशी केली होती. तेच सूत्र पकडून पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला येथील प्रचार सभेत मोदींची तुलना ‘शोले’ चित्रपटातील खलनायक गब्बर सिंग या डाकूशी केली. गब्बर सिंगने ‘कितने आदमी थे’ असे विचारले की, लोकांचा भीतीने थरकाप उडायचा. तशीच मोदींच्या ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली आहे. कारण आता नशिबी काय वाढून ठेवले आहे, याची त्यांना भीती वाटते, असे ते म्हणाले.
मोदी सरकारने ‘पोकळ’ भाषणे बंद करावीत
नवी दिल्ली : वाढत्या किमतींना आळा घालून लोकांना रोजगार देता येत नसेल, तर नरेंद्र मोदी सरकारने ‘पोकळ’ भाषणे देण्याचे थांबवावे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी हल्ला केला. टिष्ट्वटरवर गांधी म्हणाले की, ‘‘महेंगी गॅस, महेंगा रेशन, बंद करो, खोखला भाषण, दाम बांधो, काम दो, वर्ना खाली करो सिंघासन.’’ या टिष्ट्वटसोबत त्यांनी घरगुती गॅस व इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतीची बातमीही जोडली आहे. गुजरात दौºयात राहुल गांधी यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, बेरोजगारी, नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर आणि खालावलेल्या आर्थिक परिस्थितीबद्दल मोदी सरकारवर जोरदार टीका करून, लोकांचे (विशेषत: समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्यांचे) लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.
काँग्रेसने मैदानातून पळ काढला, निवडणूक एकतर्फी
उना : हिमाचल प्रदेशातील निवडणुकीत आता मजा राहिली नाही. कारण काँग्रेसने मैदानातून पळ काढल्याने निवडणूक एकतर्फी झाली आहे, असे सांगतानाच, आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उना येथे झालेल्या सभेत व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही निवडणूक आमचा पक्ष नव्हे, तर राज्यातील जनता लढवित आहे. भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न, यावरून राज्यातील जनता काँग्रेसला धडा शिकविणार आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने ५७ हजार कोटी रुपयांच्या सबसिडीचा दुरुपयोग केला. आम्ही हा दुरुपयोग थांबविला. गरिबांच्या कल्याणासाठी आता हा निधी वापरला जात आहे.