चेन्नई: कर्नाटकमधील निवडणुकांमुळे कावेरी पाणीवाटबाबत केंद्र सरकार तामिळनाडूतील जनतेवर अन्याय करत आहे. पंतप्रधान मोदींनी तात्काळ निर्णय घेऊन हा गैरसमज दूर केला पाहिजे. कारण, कोणत्याही निवडणुकांपेक्षा जनता जास्त महत्त्वाची असते, हे मोदींनी ध्यानात ठेवावे, असे मत अभिनेता व राजकारणी कमल हसन यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी डिफेन्स एक्स्पोच्या उद्घाटनासाठी चेन्नईत आले होते. मोदींच्या तामिळनाडू भेटीच्या आधी ट्विटरवर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. कावेरी पाणी वाटप प्रश्नात अन्याय झाल्याची भावना तामिळनाडूतील लोकांमध्ये आहे. त्यामुळेच #गोबॅकमोदी हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. याच पार्श्वभूमीवर कमल हसन यांनीदेखील एक व्हीडिओ ट्विट करून मोदींसमोर आपले म्हणणे मांडले. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पाँडिचेरी या राज्यांमध्ये कावेरी नदीतील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी नियामक मंडळ स्थापन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यामध्ये चालढकल करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे केंद्राने हा गैरसमज दूर करावा. तुम्ही मनात आणल्यास तामिळनाडूला लगेच न्याय मिळू शकतो. जनता ही निवडणुकांपेक्षा जास्त महत्त्वाची असते, हे लक्षात ठेवा, असे कमल हसन यांनी व्हीडिओत म्हटले आहे.
मोदीजी, निवडणुकांपेक्षा जनता जास्त महत्त्वाची असते- कमल हसन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:09 PM