ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 19 - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेने अजून दोन पावलं टाकली आहेत असा टोमणा मारला आहे. अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी आसाममधील पक्षाच्या विजयासोबत इतर राज्यांमधील पक्षाच्या कामगिरीवर मत मांडले.
ज्यांनी संसदेतील कामकाजात अडचण आणली, मुद्द्यांचं राजकारण केलं त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला असल्याचं निकालावरुन स्पष्ट होत आहे. अडवणुकीचं राजकारण करणा-या काँग्रेस पक्षाला हा निकाल धडा आहे. निकाल पाहून कोणीही काँग्रेससोबत जाण्याची हिंमत करणार नाही. जे गेले आहेत त्यांचा पराभव झाला असल्याची टीका अमित शहा यांनी केली आहे.
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
निवडणुकीतील निकालामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 वर्षाच्या कार्यकाळावर आनंदी असल्याचं स्पष्ट होत आहे असं अमित शहा बोलले आहेत. आसाममधील विजय अत्यंत महत्वाचा आहे. आसामला विकसित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही अमित शहा यांनी दिलं आहे.
राजकारणाला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम आम्ही केलं असल्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा अमित शहा यांनी केला आहे. भाजपाला स्वत:च्या बळावर बहुमत मिळालं आहे. 2019 मध्ये आमच्या कामगिरीच्या आधारावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. देशाच्या विकासासाठी ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं स्वागत असल्याचंही अमित शहा बोलले आहेत.