नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचीही गत इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच होईल, केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा आहे. जनता त्यांना धूळ चारेल, अशी शापवाणी करीत खळबळ उडवून दिल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी लगेच घूमजाव केले आहे. मोदी सरकारमध्ये देशाशी संवाद साधण्याचा अभाव असल्याकडे लक्ष वेधत सिन्हा यांनी केलेल्या या विधानामुळे भाजपचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून, सिन्हा यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली आहे. सिन्हा यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत रविवारी सारवासारव चालविली होती.गोव्यातील डोना पौला येथे शनिवारी ‘डिफिकल्ट डायलॉग्ज’ या परिषदेत गट चर्चेत सहभागी होताना सिन्हा म्हणाले की, भारतीय जनता मोदींना धूळ चारेल. त्यासाठी तुम्हाला केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, खुलासा करताना सिन्हा यांनी मोदींसंदर्भात विधान केल्याचा इन्कार केला आहे. ज्यांनी कुणी हे वृत्त दिले त्यांनी चुकीचा अर्थ काढला. सध्या मी, माझे आणि माझ्यासाठी ही संस्कृती आली असून, अशावेळी संवाद साधण्यात काय अर्थ, असा सवालही त्यांनी केला होता. लोकप्रतिनिधींनी सातत्याने जनतेकडे जाऊन संवाद साधायला हवा, असे सांगत त्यांनी १९७५ च्या आणीबाणीचे स्मरण करवून दिले. असंतोषाचा आवाज दडपण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली असता देशात काय घडले, भारतातील जनतेने कसे उत्तर दिले ते सर्वांना माहीत आहे. पथभ्रष्टता येथे तेथे दिसून येत आहे. ज्या पद्धतीने काही बाबी घडत आहेत, ते पाहता सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण गंभीर असायलाच हवे. थोर भारतीय समुदाय त्याची काळजी घेईल. संवाद साधण्यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना जनता धूळ चारेल. त्यासाठी केवळ पुढील निवडणुकीपर्यंतच वाट बघावी लागेल, असा इशाराही सिन्हा यांनी दिला. करवून दिले आणीबाणीचे स्मरणकाही लोक असहिष्णुतेबाबत बोलतात तेव्हा मी त्यांना इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचे स्मरण करवून देतो. १९७७ मध्ये जनतेने इंदिराजींना धडा शिकवला होता. कारण चर्चा दडपणे किंवा असहिष्णुता आपल्या रक्तात नाही. त्यामुळेच लोकशाही आणि संवाद दोन्ही जिवंत राहिले आहेत, असेही सिन्हा म्हणाले. आणीबाणीचा काळ १९ महिन्यांचा होता. त्यानंतर जनतेने काँग्रेसचे सरकार उलथवून लावले होते. सध्या मोदी सरकारलाही तेवढाच काळ झाला आहे, असा संदर्भही त्यांनी दिला.मंत्रिपद न मिळाल्यामुळे यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा निराधार वक्तव्ये करीत आहेत. या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे खा. रवींद्र कुशवाह यांनी रविवारी केली. पुत्र जयंत सिन्हा हे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत. मात्र, तेवढ्यावर यशवंत सिन्हा यांचे समाधान झालेले नाही. बिहारच्या निवडणुकीनंतर शत्रुघ्न सिन्हा हेही आत्मघातकी विधाने करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जनता मोदींना इंदिराजींप्रमाणे धूळ चारेल
By admin | Published: February 01, 2016 2:13 AM