लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मतदान केल्यानंतर सांगितले की, देशातील जनतेने या निवडणुकीत खोटे, द्वेष व अपप्रचाराला नाकारले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत मतदान केले. मतदानानंतर आई सोनिया यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना राहुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात ते म्हणाले की, देशवासीयांनो, मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यांत तुम्ही खोटे, द्वेष आणि अपप्रचार नाकारला आहे, तसेच तुमच्या जीवनाशी संबंधित समस्यांना प्राधान्य दिले आहे. आज मतदानाचा सहावा टप्पा आहे आणि तुमचे प्रत्येक मत हे सुनिश्चित करेल की, ३० लाख सरकारी पदांवर भरती होईल. गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यात दरमहा ८,५०० रुपये येणे सुरू होईल. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या पिकांवर योग्य एमएसपी मिळायला हवा.
'ते' संविधान बदलतील
निवडणुकीत भाजप जिंकला, तर ते संविधान बदलतील, अशी भीती राहुल गांधी यांनी येथे प्रचारसभेत व्यक्त केली. अमृतसरचे उमेदवार गुरजितसिंग औजला यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित करताना ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, ही निवडणूक दोन विचारसरणींमधील लढाई आहे.