ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - विवाहसोहळ्यांमधील उधळपट्टीला चाप बसवण्याची मागणी करणा-या लोकसभा काँग्रेस खासदार रंजीत रंजन यांनी मात्र स्वत:च्या लग्नात पाण्यासारखा पैसा वाहिला होता. लग्नाला पोहोचण्यासाठी रंजीत रंजन यांनी चार्टर्ड विमान वापरलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नात रिसेप्शनसाठी एक लाख पाहुणे आले होते. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार खासदार रंजीत रंजन यांनी आपल्या संपुर्ण कुटुंबासोबत जालंधर ते विवाहस्थळापर्यंत विमानाने प्रवास केला होता. 1994 साली त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी 200 एकरात पसरलेलं मैदान बूक करण्यात आलं होतं. दिमतीला घोडे आणि हत्ती होते ते वेगळंच.
आता रंजीत रंजन यांचा हा शाही विवाहसोहळा पाहिला तर त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात किती फरक आहे हे समोर आलं आहे. रंजीत रंजन या पप्पू यादव यांच्या पत्नी आहेत. 6 फेब्रुवारी 1994 रोजी दोघांचा विवाह झाला. या लग्नाला उपस्थित राहिलेल्या उप-महापौर संतोष यादव यांनी गेल्या 48 वर्षात असं लग्न पाहिलं नसल्याचं सांगितलं आहे. या लग्नात लालू प्रसाद यांच्यापासून ते राज बब्बर यांच्यापर्यत अनेक दिग्गज सामील झाले होते. आता आपल्या या दुटप्पी भूमिकेमुळे रंजीत रंजन यांना टिकेचा सामना करावा लागत आहे.
काय आहे विधेयकात -
विवाहसोहळ्यांमध्ये आपलं आर्थिक आणि सामाजिक स्थान दाखवण्यासाठी पाण्यासारखा पैसा वाहत करण्यात येणा-या उधळपट्टीवर नियंत्रण आणण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे. पैशांच्या उधळपट्टीसोबतच विवाहसोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणा-या अमर्यादित पाहुणे आणि जेवणावर बंधन आणण्यासंबंधीही विधेयकात नमूद करण्यात आलं आहे. जे लोक विवाहसोहळ्यात पाच लाखाहून अधिक खर्च करतात त्यांनी गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नात हातभार लावावा अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
'जर एखादं कुटुंब विवाहसोहळ्यात पाच लाखांहून अधिक रक्कम खर्च करत असेल, तर त्यांनी खर्चाच्या 10 टक्के रक्कम गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नात मदत म्हणून दिली पाहिजे', असं रंजीत रंजन यांनी विधेयकात म्हटलं आहे.
लोकसभेच्या आगामी अधिवेशनात विवाह विधेयक 2016 हे खासगी विधेयकाच्या स्वरुपात मांडलं जाणार आहे. 'उधळपट्टी थांबवावी आणि साध्या विवाहपद्धतीला प्रोत्साहन मिळावं हा या विधेयकामागचा उद्देश असल्याचं', रंजीत रंजन यांनी सांगितलं . 'लग्न दोन लोकांच्या पवित्र नात्याची सुरुवात असते. अशावेळी साधेपणाला महत्व दिलं गेलं पाहिजे. पण आपल्याकडे विवाहसोहळ्यांमध्ये देखावा आणि उधळपट्टी वाढली आहे', असं रंजीत रंजन यांनी म्हटलं होतं.