BJP MP Pradeep Singh Controversial Statement : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हिंदू स्वाभिमान यात्रेदरम्यान भाजप खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अररियामध्ये राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल, असे खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, लग्नाच्या वेळी तुमची जात आणि कुटुंब शोधून लग्न करा, असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या सोमवारी (२१ ऑक्टोबर) संध्याकाळी अररिया आरएस येथे आयोजित कार्यक्रमात खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी हे विधान केले. दरम्यान, प्रदीप कुमार सिंह यांनी केलेले हे विधान निषेधार्ह आहे, असे मुद्दा संघटनेचे संस्थापक फैसल जावेद यासीन म्हणाले. खासदारांच्या विधानाला उत्तर देताना फैसल जावेद यासीन यांनी घोषणाबाजी करत अररियात राहायचे असेल तर सामाजिक सलोखा राखावा लागेल, असे सांगितले. याशिवाय, मंगळवारी (२२ ऑक्टोबर) फैसल जावेद यासीन यांच्या नेतृत्वाखाली काही तरुणांनी अररिया शहरात रस्त्यावर निदर्शने केली.
नेमकं काय म्हणाले खासदार?व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी म्हटले आहे की, "स्वतःला हिंदू म्हणायला लाज कशाची? आम्ही म्हणतो की जर तुम्हाला अररियात राहायचे असेल तर तुम्हाला हिंदू व्हावे लागेल. जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न करायचे असेल, तेव्हा जात शोधा, परंतु जेव्हा हिंदूंच्या ऐक्याचा प्रश्न येतो, तेव्हा मग आधी हिंदू बना आणि मग जात शोधा."
राजकीय वर्तुळात वातावरण तापलेदरम्यान, खासदार प्रदीप सिंह यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर लोक त्यांना खूप ट्रोल करत आहेत. मात्र, भाजपशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, हे विधान दोन धर्मांसाठी नसून वेगवेगळ्या मार्गांनी विभागलेल्या हिंदूंना एकत्र आणण्यासाठी आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या लोकांनी समाजातील बंधुभाव संपवण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.