'लोकांनी घुसखोर आणि शरणार्थी यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 05:49 AM2019-12-23T05:49:00+5:302019-12-23T06:23:10+5:30

पंतप्रधान मोदींचे आवाहन : विरोधकांवर अपप्रचार व चिथावणीचा आरोप

'People should notice the difference between intruder and refugee' says narendra modi | 'लोकांनी घुसखोर आणि शरणार्थी यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवा'

'लोकांनी घुसखोर आणि शरणार्थी यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवा'

Next

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष अपप्रचार करून लोकांना चिथावणी देत आहेत, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘माझा तिरस्कार करा, हवे तर माझे पुतळे जाळा, पण देशवासियांच्या संपत्तीचे नुकसान करू नका’, असे आवाहन रविवारी येथे केले.

दिल्ली महानगरातील १७०० हूनही अधिक बेकायदा वसाहती नियमित करण्याच्या निर्णयाबद्दल दिल्ली प्रदेश भाजपाने रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या ‘अभिनंदन सभे’त मोदी बोलत होते. या सभेने मोदींनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचेही बिगुल फुंकले. सुमारे सव्वा तासाच्या भाषणात मोदी यांनी बव्हंशी सुधारित नागरिकत्व कायदा व त्याविरोधात देशात सुरु असलेले आंदोलन यावर सविस्तर भाष्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपासून विरोधक काही तरी निमित्त शोधून देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करून मोदी म्हणाले की, खरे तर या नव्या नागरिकत्व कायद्याचा भारतातील मुस्लिमांशी तर सोडाच पण देशाच्या १३० कोटी नागरिकांपैकी कोणाचाही संबंध नाही. आम्ही २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून ‘एनआरसी’ची आम्ही कधी चर्चा केली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त आसाममध्ये ‘एनआरसी’ नोंदणी करावी लागली. तरीही मुस्लिमांना ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये ठेवणार असल्याचा प्रचार शहरी नक्षलींनी व इतरांनी सुरु केला. परंतु आसाम सोडून उर्वरित भारतात ‘एनआरसी’ लागू करण्याचा विचार नसल्याची ग्वाही देऊन त्यांनी मुस्लिमांना आश्वस्त केले.

कोणी अपप्रचार केला तरी सुशिक्षित तरुणांनी त्यास बळी पडून डोकी भडकावून घेई नयेत, असे सांगून पंतप्रधानांनी उपस्थित श्रोेत्यांना आवाहन केले की, तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा आदर करा. हा कायदा तुम्ही स्वत: वाचा आणि समजावून घ्या. तुम्हीच निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी पूर्ण जबाबदारीने हा कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे संसदीय शुचितेचा सन्मान राखा.
स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत नागरिकांचे रक्षण करताना ३३ हजार पोलिसांनी प्राणांची आहुती दिली आहे, याचे स्मरण देऊन पंतप्रधांनीनी आंदोलकांकडून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला. आंदोलनाच्या नावाने होणाºया हिंसेचा निषेध करण्याऐवजी मौन बाळगणाऱ्यांची या हिंसाचारास मूक संमती असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.

विविधतेत एकता हीच भारताची विशेषता
सुरुवातीस मोदींनी ‘विविधतेत एकता, हिच भारताची विशेषता’ अशी नवी घोषणा दिली. घोषणेतील ‘विविधतेत एकता’ हा पूर्वार्ध पंतप्रधनांनी सांगितला व ‘हिच भारताची विशेषता’ हा उत्तरार्ध श्रोत्यांना पूर्ण करण्यास सांगितला. घोषणेचा त्रिवार जयघोष केल्यानंतर मोदींनी सुमारे सव्वा तास भाषण केले.


जाती, धर्माचा भेदभाव नाही

आमच्या सरकारने कोणताही निर्णय घेताना वा अंमलबजावणी करताना जाती, धर्माच्या आधारे भेदभाव केल्याचे एक तरी उदाहरण अपप्रचार करणाऱ्या विरोधकांनी दाखवावे, असे आव्हान देत मोदी म्हणाले, प्रत्येक योजना राबविताना गरीब व वंचितांचे कल्याण हा एकच निकष समोर ठेवला.

लोकांनी घुसखोर आणि शरणार्थी यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवा. घुसखोर चोरून देशात येतात व आपली ओळख लपवत राहात असतात. या उलट शरणार्थी आपले भविष्य सुखकर व्हावे यासाठी उघडपणे देशात येतात व आपली ओळख स्वत:हून जपतात.
- नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री


मोदी-शहांच्या द्वेषाला प्रेमानेच पराभूत करू - राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसवर सडकून केलेल्या टिकेला कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी ‘तुमच्या व्देषाच्या राजकारणाला आम्ही प्रेमानेच पराभूत करू’, असे प्रत्युत्तर रविवारी दिले. गेले काही दिवस परदेशात असलेल्या राहुल गांधी यांनी देशातील युवापिढीला उद्देशून टिष्ट्वट करत नरेंद्र मोदी यांच्या टिकेला उत्तर दिले.

Web Title: 'People should notice the difference between intruder and refugee' says narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.