CDS जनरल बिपीन रावत(General Bipin Rawat) यांचे बुधवारी तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांची पत्नी आणि लष्करी अधिकाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. सर्वांचे पार्थिव आज दिल्लीत पोहोचणार आहे. पण त्याआधी, जनरल रावत आणि इतरांचे पार्थिव तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील मद्रास रेजिमेंटल सेंटरमधून रुग्णवाहिकेद्वारे सुलूर एअरबेसवर आणण्यात आले. यादरम्यान नागरिकांकडून त्यांचे पार्थिव नेणाऱ्या वाहनांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
ज्या रस्त्यावरून रुग्णवाहिका गेली, त्या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी होती. लोकांनी अॅम्ब्युलन्सवर फुलांचा वर्षाव केला आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. एएनआय या वृत्तसंस्थेने याचा एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये लष्कराची वाहने आणि रुग्णवाहिका रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे. लोक रुग्णवाहिकांवर फुलांचा वर्षाव करत आहेत आणि भारत माता की जयच्या घोषणा देत आहेत. देशातील पहिल्या सीडीएसला लोकांनी पानावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला.
सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव संध्याकाळी 7.30 वाजता पालम विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी 7.45 च्या सुमारास पार्थिवांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. याआधी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. तसेच, भारतीय हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे.