वाराणसी - गटार, दूषित पाणी, कचरा अशा अनेक समस्यांचा सामना हा अनेकदा परिसरातील लोकांना करावा लागतो. नगरसेवक याकडे लक्ष देत नाहीत अशी तक्रारही स्थानिकांकडून केली जाते. लोकांच्या समस्या न सोडवणं एका नगरसेवकाला चांगलंच महागात पडलं आहे. स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. नगरसेवक काम करत नसल्याने स्थानिकांनी त्यांना दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवल्याची घटना समोर आली आहे. वाराणसीच्या बलुवाबीरमध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या बलुवाबीर परिसरातील लोकांना गेल्या कित्येक दिवसांपासून गटार आणि दूषित पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. नगरसेवकाकडे याबाबत सातत्याने तक्रार केली पण त्यानी याकडे दूर्लक्ष केलं. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवकालाच दोरीने बांधून गटाराच्या दूषित पाण्यात बसवलं. बऱ्याच दिवसांपासून त्रस्त असल्याने गावकऱ्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केलं आहे. हे प्रकरण वाराणसी वॉर्ड क्रमांक 79 अंबियापूर बाजार क्षेत्रातील आहे.
तुफैल अंसारी असं या नगरसेवकाचं नाव आहे. या वॉर्डशी संबधित जवळील भागात बऱ्याच काळापासून गटारातील पाणी रस्त्यावर येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. दूषित पाणी प्यायल्यामुळे येथील लहान मुलं आजारी पडत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. स्थानिकांनी गटाराच्या समस्येविषयी अनेकदा नगरसेवकाकडे तक्रार केली. मात्र त्यांनी यावर कोणतीच उपाययोजना केली नाही.
गटारांचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिकांना गटाराच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. त्याच दरम्यान नगरसेवक त्या परिसरातून जात असलेले लोकांनी पाहिले. त्याच पाण्यात नगरसेवकाला एका खुर्चीवर बसवण्यात आलं आणि दोरीने बांधलं. त्यानंतर या भागातील काही नागरिकांनी विरोध करणाऱ्या लोकांशी चर्चा करीत नगरसेवकाची सुटका केली. लोकांनी केलेल्या या कृत्यांची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.