नवी दिल्ली : हजारो मोबाईलमध्ये आपोआप आधार हेल्पलाईन नंबर सेव्ह झाल्यामुळे खळबळ उडाल्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरटी ऑफ इंडियानं स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणाचा हॅकिंग किंवा डेटा चोरीशी काहीही संबंध नाही, असं आधारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'गुगलकडून चूक झाल्यानं आधारचा हेल्पलाईन नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला. त्याचा गैरफायदा काही स्वार्थी हेतू असलेल्या व्यक्ती घेत आहेत. आधारबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. आधारविरोधात वातावरण निर्माण करु पाहणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो,' असं यूआयडीएआयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'गुगलकडून झालेल्या एका चुकीमुळे आधार हेल्पलाईन नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झाला. त्यावरुन अनेकजण आधारविरोधात लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हेल्पलाईन नंबरच्या मदतीनं मोबाईलमधील माहिती चोरली जाऊ शकत नाही. ट्विटर आणि व्हॉट्स अॅपवर सध्या याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत', असं यूआयडीएआयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'त्या' नंबरमुळे मोबाईलमधील माहितीची चोरी अशक्य; आधारचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 7:26 AM