बोलपूर : पश्चिम बंगालमधील लोकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राजवटीविरोधात प्रचंड संताप आहे. तेथील जनतेला आता बदल हवा आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सांगितले. या राज्यातील राजकीय हिंसाचार, खंडणीखोरी, बांगलादेशी घुसखोरांची समस्या या गोष्टींना लोक विटले आहेत, असेही ते म्हणाले. अमित शहा शनिवारपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातल्या बोलपूर भागामध्ये भाजपने रविवारी अमित शहा यांचा भव्य रोड शो आयोजिला होता. त्यावेळी प्रचंड संख्येने आलेले भाजप कार्यकर्ते पाहून अमित शहा भारावून गेले. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यात इतका भव्य रोड शो मी प्रथमच पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वास असून, त्यामुळेच या रोड शोला इतका मोठा प्रतिसाद मिळाला. अमित शहा म्हणाले की, भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला घृणास्पद होता. ममता बॅनर्जी यांच्या कारकीर्दीत पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार कळसाला पोहोचला आहे. त्यांच्या राजवटीत सुमारे ३०० भाजप कार्यकर्त्यांचा बळी गेला. ममता बॅनर्जी शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचा आव आणतात. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवले आहे.
ममता बॅनर्जी यांच्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेत प्रचंड संताप- अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 1:03 AM