Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्ती स्टार विनेश फोगटने अलीकडेच तिच्या रेल्वे नोकरीचा राजीनामा दिला आहे आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगटचं सुवर्णपदक काही ग्रॅम वजनाने हुकलं होतं. त्यानंतर निराश झालेल्या विनेश फोगटने कुस्तीला रामराम ठोकला. त्यानंतर आता विनेश राजकीय आखाड्यात उतरली आहे. विनेशच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी तिच्यावर टीका केली होती. ब्रिजभूषण सिंह यांच्या टीकेवर आता विनेश फोगटने प्रत्युत्तर दिलं आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगट यांना उमेदवारी दिली आहे. विनेश आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सायंकाळी उमेदवारांच्या पहिल्या यादीत नावे निश्चित झाल्यानंतर आता विनेशने आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे.रविवारी विनेशने जुलाना येथे माध्यमांशी संवाद साधताना विनेशने ब्रिजभूषण सिंह यांच्या आरोपांना उत्तर दिले.'बृजभूषण सिंह म्हणजे देश नाही, असं विधान विनेश फोगटने केलं आहे.
ब्रिजभूषण म्हणजे देश नाही. माझा देश माझ्या पाठीशी उभा आहे. माझीच माणसे माझ्यासोबत आहेत, असं प्रत्युत्तर विनेश फोगटने दिलं आहे. यावेळी विनेशला काँग्रेसने तुला आंदोलनाला बसवल्याचा आरोप करण्यात आला असा प्रश्न विचारला होता. भाजपनेच आम्हाला जंतरमंतरवर बसण्याची परवानगी दिली होती. पदक न मिळाल्याचा त्रास त्याच दिवशी कमी झाले जेव्हा मी परतले आणि माझ्या लोकांनी माझे स्वागत केले, असं विनेश फोगटने म्हटलं आहे.
यावेळी विनेशने ब्रिजभूषण शरण सिंह आणि हरियाणाचे माजी मंत्री अनिल विज यांनी तिच्याविरोधात केलेल्या विधानांना प्रत्युत्तर दिले. "गेल्या दीड वर्षांपासून (भाजप नेत्यांकडून) अशी विधाने आपण ऐकत आहोत. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. मी ऑलिम्पिकमध्ये जिंकले नाही याचा आनंद आहे, असे ते म्हणत असतील. तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण हे पदक माझे नसून संपूर्ण देशाचे होते," असं विनेशने म्हटलं.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेल्या वक्तव्यानंतर विनेश फोगटचे वक्तव्य आले आहे. सिंग यांनी फोगटवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता आणि देवाने तिला शिक्षा केली म्हणून ती पदक जिंकू शकली नाही असं म्हटलं होते.