पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा चारा घोटाळ्यावरून लालू प्रसाद यादव यांच्यावर टीकास्त्र डागले. भागलपूर येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९वा हफ्ता जमा करण्यात आला. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी नितीश कुमार यांचा लाडका मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताचे कृषी निर्यात वेगाने वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला आता जास्त किंमत मिळत आहे. आता बिहारला मखाना उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भागलपूरच्या विणकरांना आम्ही सुविधा देऊ. कापड उद्योगही आम्ही पुढे नेत आहोत. रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
पीएम मोदींची लालू प्रसाद यादवांवर टीका
लालू प्रसाद यादव यांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काही लोक तर जनावरांचा चाराही खाऊन टाकतात. जे चारा खातात, ते कधीच परिस्थिती बदलू शकत नाहीत. एनडीए शेतकऱ्यांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. मी नेहमी असे मानतो की, गरीब, अन्नदाता, तरुण आणि महिला हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत", असे मोदी म्हणाले.
"पूर्वी छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. एनडीएचे सरकार नसते तर शेतकऱ्यांना सन्मान निधीही मिळाला नसता. एनडीए सरकारने शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली आहे. आम्ही नुकसान होणार नाही, यासाठी उपाय योजना केल्या आहेत. काँग्रेसला शेतकऱ्यांचं महत्त्व नाही. त्याच्या सरकारमध्ये मच्छिमारांनाही लाभ मिळत नव्हता", अशी टीका मोदींनी केली.
मी सुद्धा वर्षातील ३०० दिवस मखाना खातो -मोदी
"आता मखाना बोर्ड लवकरच स्थापित केले जाणार आहे. त्यामुळे बिहारमधील शेतकऱ्यांना लाभ होईल. वर्षातील ३०० दिवस मी सुद्धा मखाना खातो. आता बिहारमधील मखानाला पुढे नेण्याची वेळ आहे. बिहारचा प्राचीन गौरव आम्ही परत आणू. पूर्वोदयाकडूनच विकसित भारताच्या उदय होईल", असेही मोदी यावेळी म्हणाले.