नवी दिल्ली : देशाच्या सीमांचे संरक्षण,काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव वा वर्षाकाठी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार तमाम आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेने मोठ्या अपेक्षेने २८२ उमेदवार विजयी करून, भाजपच्या हाती सत्ता दिली. मात्र अवघ्या २ वर्षात धार्मिक ध्रुवीकरणाचा विद्वेष पसरवून जनतेला सरकारने निराश केले आहे. सरकारवर केवळ टीका करण्यासाठी हे मुद्दे आपण बोलत नसून या विषयांबाबत पंतप्रधानांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलतांना केले. त्यांचे पूर्ण भाषण पंतप्रधान मोदींनी शांतपणे ऐकले. आपल्या भाषणात आझाद यांनी अभिभाषणातील त्रुटींचा उल्लेखही केला.धार्मिक धु्रवीकरणाचा मुद्दा अधोरेखित करतांना लव्ह जिहाद, घरवापसी, ख्रिश्चन चर्चेसवर चढवण्यात आलेले हल्ले, भाजपचे खासदार, मंत्री, व समर्थकांव्दारे वारंवार सांप्रदायिक तणाव निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा उल्लेख करीत आझाद म्हणाले, पंतप्रधान मोदी तुम्हाला धोका आमच्यापासून नव्हे तर तुमच्या पक्षांतर्गत सहकाऱ्यांकडून आणि समर्थकांकडूनच अधिक आहे. (विशेष प्रतिनिधी)
मोदींना सत्ता देणारी जनता २ वर्षांतच निराश
By admin | Published: March 03, 2016 3:32 AM