नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरबाबतकाँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्त्यांवरुन भाजपाने जोरदार टीका केली आहे. यातच, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बुधवारी श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद झाली. जम्मू-काश्मीरप्रश्नी राहुल गांधी यांनी बालिश वक्तव्य केले आहे. जेव्हा संसदेमध्ये त्यांच्या पक्षाचा नेता काश्मीरच्या मुद्द्याला संयुक्त राष्ट्रांशी जोडून बोलत होता, तेव्हाच राहुल गांधींनी बोलायला हवे होते. त्याचवेळी त्यांनी त्या नेत्याला थांबवून सांगायला पाहिजे होते की, आमची काश्मीरबाबत ही भूमिका आहे. काँग्रेसने आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. याचबरोबर, ज्यावेळी देशात निवडणुका येतील. त्यावेळी या नेत्यांच्या विरोधकांना काहीही बोलण्याची गरज नाही. जर ते म्हणतील हे (विरोधी नेते) कलम 370 चे समर्थक आहेत, तर लोक त्यांना बुटाने मारतील, असेही ते म्हणाले.
आगामी दोन- तीन महिन्यात जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये सरकारी खात्यातील ५० हजार जागा रिक्त असून या जागेवर लवकरच मेगाभरती करणार आहे. त्यामुळे या भरतीचा फायदा या राज्यातील तरुणांनी घ्यावा, असे आवाहन सत्यपाल मलिक यांनी केले. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसांत काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने काही मोठ्या घोषणा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याशिवाय, आगामी सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाची कामे करण्यासाठी केंद्राच्या विविध मंत्रालयाच्या बैठका सुरू आहेत. राज्यात विकास व्हावा, ही सरकारची इच्छा असून त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही सत्यपाल मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक विधाने केली होती. याच विधानाचा वापर करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानाचा हवाला देत काश्मीरमधील स्थिती खराब असल्याचा दावा केला आहे. मात्र राहुल गांधींच्या विधानाचा वापर पाकिस्तानने केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य बदलत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा दावा केला होता.