नवी दिल्ली - उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू यांनी अर्थमंत्र्यांना चिमटा घेतला. वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू यांच्या 'मूव्हींग ऑन मूव्हींग फॉरवर्ड अ इअर इन अ ऑफिस' या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात नायडू यांनी शेती क्षेत्राविषयी मत मांडताना अर्थमंत्री अरूण जेटलींना लक्ष्य केले. तसेच शेतीविषयक योग्य धोरण न राबविल्यास शेतकरी शेतीपासून दूर पळतील, असे भाकितही त्यांनी केले.
नायडू यांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, एच.डी.देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटलींसह अनेक उच्चपदस्थ हजर होते. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी शेती क्षेत्रातील विकासाबद्दल नाराजी दर्शवली. कृषी क्षेत्राकडे अधिक प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. अर्थमंत्रीदेखील येथे आहेत. कदाचित, त्यांना माझे हे वक्तव्य आवडणार नाही. कारण, त्यांना सर्वांचीच काळजी घ्यावी लागते. पण, आगामी काळात कृषी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात लक्ष घालावे लागणार आहे, अन्यथा लोक शेती करायचे सोडून देतील, अशा शब्दात नायडू यांनी भीती व्यक्त केली.
तसेच संसदेतील कार्यप्रणालीबाबतही मी थोडासा नाराज आहे. कारण, संसदेतही पाहिजे तितके, यशस्वीपणे काम होत नाही. इतर अनेक क्षेत्रात आपण विकास करत आहोत. विश्व बँक, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्याकडून जे रेटींग मिळत आहे, ते उत्तम आहे. देशाच्या आर्थिक विकासाबाबत जे काही होत आहे, ते अतिशय चांगल आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. मात्र, शेतीविषयक धोरणांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा शेतीपासून शेतकरी दूर पळतील अशी भीती नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर व्यक्त केली. दरम्यान, नायडूजी हे हाडाचे शेतकरी आहेत. त्यामुळेच मी ग्रामीण विकास मंत्री होऊ इच्छितो, असे नायडू्ंनी एकदा म्हटले होते, अशी आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली.