नवी दिल्ली : सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने चालविलेला खोटारडेपणा जनता अजिबात सहन करणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व केंद्र सरकारचा घसरगुंडीला लागलेला कारभार या दोन मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सहारनपूर येथून काढलेल्या पदयात्रेचा नॉयडा येथे शनिवारी समारोप झाला. त्यावेळी जन अधिकार सभेत सिन्हा बोलतहोते.ते म्हणाले की, आपण जे करतो ते जनतेच्या लक्षात येणार नाही, असे राजकारण्यांना वाटत असते. खोटेनाटे वागले तरी कोणी जाब विचारणार नाही, अशीही त्यांनी समजूत करून घेतलेली असते. एखाद्या सामान्य माणसाने खोटारडेपणा केला तर त्याच्याकडे एकवेळ दुर्लक्ष करता येईल; पण सर्वोच्च नेताच जर असे वागू लागला तर ते सहन करता येणार नाही. कारण तो एक विशिष्ट हेतू मनात बाळगून तसे वर्तन करत असतो. सध्या राजकीय नेते मनापासून काम करताना दिसत नाहीत. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत वारंवार झळकलो व प्रसारमाध्यमांशी संवाद साधला म्हणजे आपण राष्ट्रीय नेते झालो, असेही त्यांना वाटते.भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा या सभेत म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष देशापेक्षा मोठा नाही. जो पक्ष काम करतो त्यालाच मत, द्या असे आवाहनही त्यांनी केले.>भाजपाचा पराभव करा - केजरीवालया जन अधिकार सभेमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये आप सरकारने अल्पावधीत अनेक सुधारणा केल्या. ही इच्छाशक्ती केंद्र सरकार का दाखवित नाही? भाजपाच्या कारभारावर देशातील सर्व जनता नाराज आहे. लोकांना आता बदल हवा आहे. त्यासाठी निवडणुकांत मतदारांनी भाजपाचा पराभव करायला हवा.
सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा खोटेपणा जनता सहन करणार नाही - यशवंत सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 4:27 AM