चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राजकारणात उतरण्याची घोषणा केली होती. तसेच, आपण नवीन पार्टीची स्थापना करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, अद्याप कमल हासन यांनी पार्टीसाठी अधिकृत कोणतीही पाऊले उचलली नाहीत. मात्र, पार्टीसाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि लोकांनी फंड देण्यास सुरुवात केली आहे. तमीळ मॅगझिनमध्ये आलेल्या कॉलममध्ये कमल हासन यांनी याबाबत लिहिले आहे. ते म्हणाले की, ज्या लोकांनी आणि चाहत्यांनी पार्टीसाठी पैसे दिले आहेत. त्यांचे पैसे परत करणार आहे. पार्टीची स्थापना आणि नामकरण करण्याआधीच फंड जमा केला. तर तो बेकायदेशीर ठरेल. त्यामुळे आधी पार्टी काढण्यात येईल. नामकरण करण्यात येईल. त्यानंतरच फंड जमा करण्यात येईल, असे कमल हासन यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी असे स्पष्ट केले आहे की, पार्टीसाठी आलेला फंड परत करताेय याचा अर्थ असा नाही की मी राजकारणात येण्यापासून माघार घेत आहे. आपल्याला सुरुवातीला पार्टी मजबूत करायची आहे. तसेच, भवितव्याचा विचार केला पाहिजे. आगामी पिढीकडे पाहिले नसल्यामुळे अनेक राजकीय पार्ट्या अयशस्वी ठरल्या आहेत, असेही कमल हासन यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या नवीन पार्टीसाठी चाहत्यांकडून आणि लोकांकडून आत्तापर्यंत 30 कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पक्षाच्या स्थापनेआधी राज्याचा दौरा करणारराजकीय पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करायच्या आधी अभिनेते कमल हासन हे तामिळनाडूचा दौरा करणार आहेत. चांगला तामिळनाडू हे माझे स्वप्न आहे. पक्ष स्थापन करायच्या आधी त्याचा पाया बळकट करणे महत्त्वाचे आहे. पक्षाचे नाव जाहीर करायची ना गरज आहे ना घाई, असे कमल हासन यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले होते.
ममता बॅनर्जींसह दोन मुख्यमंत्र्यांना भेटलेकमल हासन हे 23व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कोलकात्याला गेले होते; हीच संधी साधून त्यांनी ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली. कमल हासन यांनी भेट घेतलेल्या त्या तिस-या बिगर-भाजपा आणि बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री आहेत. याआधी 1 सप्टेंबर रोजी त्यांनी थिरुवनंतपुरमला जाऊन केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भोजनाचे निमंत्रण देऊन चेन्नईला बोलावून घेतले होते. नंतर दोघे एकत्रितरीत्या पत्रकारांनाही सामोरे गेले होते. भेटीचा उद्देश आणि अजेंडा याबाबत दोघांनीही मौन बाळगले होते. .