ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - गाजावाजा करत एकत्र आलेला जनता परिवार अवघ्या काही महिन्यांमध्ये दुभंगला असून समाजवादी पक्षाने जनता परिवारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावर लढणार असल्याने बिहारमधील महाआघाडीही विस्कटली आहे.
मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी विखुरलेल्या जनता दलाने एप्रिलमध्ये गाजावाजा करत एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला होता. काँग्रेस व भाजपासमोर तिस-या आघाडीचा पर्याय निर्माण करण्याचा जनता परिवाराचा प्रयत्न होता. मात्र बिहार विधानसभेतील पहिल्या परीक्षेतच जनता परिवारात फूट पडली. जागावाटपावरुन नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांनी आमचे विचारच जाणून घेतली नाही असा आरोप सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी केला आहे. समाजवादी पक्षाचा मित्रपक्षांनी अपमान केला असेही त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी दिल्लीत समाजवादी पक्षाच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सपाने बिहारमधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे यादव यांनी सांगितले. आम्ही बिहारमधील काही पक्षांसोबत चर्चा करत आहोत असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त), राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व समाजवादी पक्ष यांची महाआघाडी झाली होती. मात्र आता या महाआघाडीतून समाजवादी पक्ष बाहेर पडल्याने महाआघाडीला धक्का बसला आहे.