नवी दिल्ली : आम्ही नरेंद्र मोदी सरकारला विरोधासाठी विरोध करणार नाही. मात्र सामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न व चुकीच्या धोरणांबाबत मोदी सरकारला धारेवर धरणारच असे राज्यसभेतील नवे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
गुलाम नबी आझाद यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर या सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी खरगे यांची या आठवड्यात निवड झाली. खरगे म्हणाले की, शेतकऱ्यांवर अन्याय करणारे नवे तीन कृषी कायदे मोदी सरकारने त्वरित रद्द करावेत. त्यानंतर शेतीतील सुधारणांकरिता केंद्र सरकारने नवीन प्रस्ताव सादर करावेत. त्या प्रस्तावांची संसदीय स्थायी समितीकडून छाननी व्हायला हवी. ते म्हणाले की, गरिबांचे प्रश्न संसदेत अग्रक्रमाने मांडा, असा आदेश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेस नेते राहुल गांधी मला दिला आहे. विविध प्रश्न संसदेत उपस्थित करून प्रसिद्धी मिळवायची आम्हाला हौस नाही.
फूट पाडण्याचे प्रयत्न
मल्लिकार्जून खरगे म्हणाले, नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे मोदी सरकारने ऐकून घ्यावे. या आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. या आंदोलनात फूट पाडण्यासाठी मोदी सरकार त्याच्या हातातील साऱ्या यंत्रणांचा वापर करत आहे.