बंगळुरू - भाजपा, हिंदुत्ववादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने कठोर टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाबाबत मोठी घोषणा केली आहे. आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहोत, असे प्रकाश राज यांनी ट्विटरवरून नववर्षाच्या शुभेच्छा देताना जाहीर केले आहे. दरम्यान, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार असलेल्या प्रकाश राज यांनी गेल्या काही काळापासून देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीबाबत सातत्याने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीला प्रकाश राज यांनी ट्विट करून आपल्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाबाबत घोषणा केली. '' सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा, नव्या वर्षामध्ये एक नवी सुरुवात करताना नवी जबाबदारी स्वीकारणार आहे. तुमच्या पाठिंब्याच्या बळावर आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवणार आहे. मी निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघाचे नाव लवकरच जाहीर करेन, अबकी बार जनता की सरकार'' असे ट्विट प्रकाश राज यांनी केले आहे.
रोखठोक भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रकाश राज हे भाजपा सरकारवर अनेकदा केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. कथुआ येथील बलात्कार प्रकरण आणि गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांनी केलेल्या ट्विटमुळे ते वादात सापडले होते. दरम्यान, कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकारला काही तासांतच राजीनामा द्यावा लागल्यानंतर प्रकाश राज यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. ''कर्नाटकचा रंग भगवा होणार नाही. सामना सुरू होण्यापूर्वीच संपला. आता 56 इंचला विसरा, 55 ताससुद्धा कर्नाटक सांभाळू शकले नाहीत." असा टोला त्यांनी मोदी आणि भाजपाला लावला होता. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.