नवी दिल्ली : प्रवासी व मालवाहतूक भाड्यात वाढ न करताही रेल्वेने उत्पन्नात वाढ करण्याची योजना तयार केली आहे. प्रवासी आता लवकरच ‘पेप्सी राजधानी’ किंवा ‘कोक शताब्दी’ रेल्वेतून प्रवास करू शकतील व तोही बँ्रडेड स्थानकावरून!रेल्वे गाड्यांना आणि स्थानकांना बँ्रडेड बनवून उत्पन्न वाढवण्याची योजना रेल्वे मंत्रालयाकडे तयार आहे. त्याला पुढील आठवड्यात रेल्वे मंडळाची मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावानुसार संपूर्ण रेल्वेला ब्रँड बनवण्यासाठी कंपनी एकत्रित प्रसारमाध्यम हक्क विकत घेऊ शकेल. त्यानंतर, कंपनी रेल्वे डब्यांच्या आत व बाहेर जाहिराती करू शकेल. या आधी रेल्वेने तुकड्या-तुकड्यांत जाहिरातींचे हक्क विकण्याचे टाळले होते. संपूर्ण रेल्वे जाहिरातींसाठी (आत-बाहेरची जागा) उपलब्ध करून देण्याचे व रेल्वेस्थानके दीर्घ काळासाठी मोठ्या कंपन्यांना उपलब्ध करून देण्यास रेल्वे तयार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेचे आधुनिकीकरण करा, रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची बनवा व प्रवासी भाडे न वाढवता उत्पन्न वाढवा, असा मोदी यांचा सातत्याने आग्रह असतो. आर्थिक टंचाईला तोंड देत असलेल्या रेल्वेने जाहिरातींच्या माध्यमांतून उत्पन्न वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्यामुळे, प्रवासी भाडेवाढ टाळण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोदींच्या सूचनेनंतर गती जाहिरातींच्या व पर्यायी माध्यमांतून महसूल वाढवा, असे नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत सांगितल्यावर, या ताज्या योजनेने गती घेतली. अशीच योजना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनेही जाहीर केली होती, परंतु तिने आकार घेतला नाही. भाडे वगळून रेल्वेचे २ हजार कोटी महसुलाचे लक्ष्य आहे.
उत्पन्नासाठी धावेल ‘पेप्सी’, ‘कोक’ रेल्वे
By admin | Published: January 10, 2017 1:17 AM