वेध - राज्यभाषेचे त्रांगडे
By admin | Published: August 19, 2015 10:27 PM
रवींद्र केरीकर
रवींद्र केरीकरभारतीय राज्यघटनेने व संविधानाने (मातृभाषेतून) भारतीय भाषांमधून प्राथमिक शिक्षण व्यवस्था असावी, अशी नियामक व्यवस्था केलेली आहे. मातृभाषेतून शिक्षण ही आधुनिक शिक्षण प्रणालीची मागणी व व्यवस्था आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा व ज्ञानसंवर्धनाची ताकद वाढते, असा संकेत आहे. आपला गोवा राज्य या सगळ्याला अपवाद बनू पाहतो आहे. मातृभाषेच्या त्रांगड्यातून कोकणी-मराठीची निवड व त्यातून देवनागरी-रोमी लिपीसाठी लढाई असा रोमांचक संघर्ष होऊनही दोन्ही भाषा राज्यभाषेच्या निवडीसाठी कमीच पडल्या व त्यामुळे मातृभाषा दूर राहून आंग्लभाषा वरचढ ठरू लागलीय. या संघर्षासाठी इंग्रजी भाषेला राजदरबारी आमंत्रण येत असल्याने हा नियामक व्यवस्थेचा व पर्यायाने राज्यघटनेचा उपर्मद असावा, असे वाटू लागते. सरकार व्यवस्थापनातून पाशवी बहुमत असल्यावर प्रबळ दावेदार आपल्या बहुमताच्या जोरावर यंत्रणा हवी तशी आपल्याकडे वळवून वाकवू शकतात हे आपण पाहतोच आहे, हा एक लोकशाहीचा दोष असावा; पण अशा पाशवी बहुमताने केलेल्या नियामक चौकटी बाहेरील गोष्टी बरोबर आहे का? याला यश म्हणावे का? असे होऊ लागल्यास राज्य कशाच्या आधारावर चालणार, असा प्रश्न जनतेला पडतो. परकीय सत्तेच्या अमलाखाली राज्य असताना मराठी माध्यमाच्या शाळा व विद्यालये चालू असायची. काही भागात तर चर्चसंस्था अशा मराठी शाळा चालवायच्या. माझ्या माहितीच्या गार्डियन एंजल हायस्कूल-कुडचडे व दाभाळ चर्च या त्यांपैकी होत व माझ्या वडिलांनी तेथे शिक्षकाचे काम केल्याचे मला चांगले आठवते. स्वातंत्र्यानंतरसुद्धा या शाळा चालल्या व त्याबद्दल चर्चसंस्था प्रशंसेस व आदरास पात्र आहेत. मात्र, आता काही कारणांसाठी इंग्रजी भाषेचे स्तोम वाढविले जात असावे, असे वाटते. माझ्या अनुभवाने कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले विद्यार्थीसुद्धा जेमतेम असतात; पण मराठी शिकून आलेले प्रगल्भ वाटतात. माझ्या नोकरीच्या अनुषंगाने हा माझा अनुभव. शिवाय, मी स्वत: 8 वीपर्यंत मराठी व नंतर इंग्रजी, पण माझे प्रभूत्व इंग्रजी भाषेवर असल्याचे मला अधिकारपदी असताना जाणवले. या सर्वाचे कारण माणसाची आकलन क्षमता व ज्ञानलालसा असावी असे वाटते; पण याबरोबरच शिक्षकवर्गाला पण विशेष महत्त्व आहे. त्यात सावडर्य़ाचे सर्वोदय हायस्कूलच्या शिक्षकांना माझ्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानाचे र्शेय जाते. महाराष्ट्र राज्यात तर मराठी माध्यमातून माध्यमिक शिक्षण घेऊन पदवी इंग्रजीत प्राप्त करतात व असे उमेदवार पुढे स्पर्धा परीक्षा पास होऊन आय.ए.एस./ आय.पी.एस. अधिकारी बनून गोव्यात येतात व दिमाखाने काम करतात. अशी परिस्थिती असताना आपण इंग्रजीचे स्तोम माजविणे अनाकलनीय वाटते. भारतीय सुरक्षा मंचने निवेदने व मोर्चे करीत वेळ काढण्यापेक्षा शक्य असेल तर कोर्टाकडूनच निर्णय घ्यावा. त्यामुळे दहशत, संघर्ष व मोर्चे, सभागर्दी करून समाजात तेढ होण्याचे टळून योग्य मार्ग सापडण्याचा उपाय कोर्टाकडून सापडेल. नियमाबाहेर वा नियामक व्यवस्थेबाहेर जाऊन तरतुदी करणे बरोबर आहे का? याचा संबंधितांनी जरूर विचार करावा, ही विनंती. यामुळे प्रशासन, समाज व जनभावना संदिग्ध बनण्याची शक्यता असते. यासाठी विशेष देखरेख करणारे व निर्बंध ठेवणारी व्यवस्था असण्याची अपरिहार्यता निर्माण झालीय असे वाटते. नपेक्षा अयोग्य निर्णयांनी देश अराजकाच्या खाईत जाण्यास विलंब लागणार नाही, अशी जनतेच्या मनात भीती होऊ शकेल. काही वेळा अशा तर्हेचे विशिष्ट स्वार्थ साधण्याच्या दूरगामी हेतूने तयार करण्यात संधिसाधू लोक पटाईत असतात व आपला सर्वसाधारण समाज त्याला बळी पडतो. यामुळे स्वार्थी लोकांचा फायदा होतो. थोड्या लोकांना कळलावीपणा करून मजा अनुभवण्याचा आनंद असतो. माझे वडील गावातील एक गोष्ट सांगायचे. एक भांडकुदळ माणूस वार्धक्याने आजारी पडून मरणपंथाला लागला. जीवनभर गावात भांडणे लावून तमाशा पाहणार्या या भागीरथाला आपण मेल्यावर गावात भांडण चालू राहावे यासाठी युक्ती सुचली; कारण आपल्यानंतर गाव शांत व सुना भासणार याची चिंता. त्याने मुलांना बोलावून आपल्या मृत्यूनंतर आपले पाय दुमडून ठेवण्यास सांगितले. मुलगे साधेभोळे त्यांनी दोन्ही पाय दुमडून ठेवले व बर्याच दुपारनंतर गावात वार्ता सांगितली. गावकरी अंत्यसंस्कारासाठी आले. तिरडी बांधली; परंतु शव तिरडीवर ठेवण्यासाठी देह सरळ होईना. पाय दुमडल्याने बर्याच तासांनी घ? झालेले असल्याने सरळ केल्यास शव बसावयास लागल्यासारखे व्हायचे. त्यामुळे या गोष्टीवरून गावकर्यात वादंग सुरू होऊन दोन तट पडले. एक गट शव सरळ करूनच तिरडीवरून न्यायला हवे म्हणणारा, तर दुसरा गट काहीच उपाय नसल्याने आहे तसेच शव तिरडीवरून न्यायला तयार असणारा. वादंग वाढून हाणामारी झाली अन् दोहोबाजूची 1-2 माणसे मेली. अखेर त्रयस्थांनी कारभार आटोपला; पण गावाची गटबाजी व तेढ कायमचे राहिले. अशीच मजा वा कलागती करून ठेवणारे महाभाग आपल्या समाजात अजूनही असावेत असे वाटते. मात्र, एकविसाव्या शतकातल्या कलागती स्मार्ट असणारच, नाही का?