कुंजल कन्स्ट्रक्शनचा ठेका कायमस्वरुपी बंद
By admin | Published: August 20, 2016 10:21 PM
जळगाव : तालुक्यातील धानोरा बुद्रुक भाग २ येथील वाळू गट क्रमांक २०चा कुंजल कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आलेला वाळूचा ठेका नियम व अटींचा भंग केल्याने कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज दिले.
जळगाव : तालुक्यातील धानोरा बुद्रुक भाग २ येथील वाळू गट क्रमांक २०चा कुंजल कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आलेला वाळूचा ठेका नियम व अटींचा भंग केल्याने कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज दिले. कुंजल कन्स्ट्रक्शनतर्फे परेश दिलीपराव कोल्हे यांना २५ जानेवारी २०१६च्या आदेशानुसार वाळू गट क्रमांक २० चा ठेका देण्यात आला होता. मात्र येथे ७ ऑगस्ट रोजी रामदास श्रीराम गवळे (कोळी, २०, रा. खेडी, ता. एरंडोल) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी वाळू उपशाविरुद्ध मोठा उद्रेक होऊन जाळपोळही झाली होती. तसेच नियमबाह्य वाळू उपसा केल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला होता.चौकशीस गैरहजेरी....या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर १० ऑगस्ट रोजी या वाळू स्थळाची उपविभागीयस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. या समितीने लेखी कळवूनही लिलावधारक हे तपासणीस उपस्थित नव्हते. त्यासाठी लिलावधारकाने वैद्यकीय कारण दर्शविले. या वाळुस्थळावर वापरासाठी ४ व २ राखीव सक्शन पंप ठेवण्याची परवानगी असताना प्रत्यक्ष नदीपात्रात सात सक्शन पंप समितीला आढळले. सद्यस्थितीत नदी पात्रात पाणी असल्याने समितीने झालेल्या उत्खननाचे मोजमाप काठीच्या सहाय्याने केले. हे मोजमाप साधारणत: चार ते पाच मीटर खोल आढळून आले. विनापरवाना साठा...नदीपात्राची रुंदी २८० मीटर असून लिलावधारकाने एक सक्शन पंप १५० मीटरवर म्हणजे एरंडोल तालुक्याच्या हद्दीतील नदीपात्रात लावल्याचे आढळले. विनापरवानगी २२५ ब्रास वाळूचा साठा करण्यासह वाहनांमध्ये वाळू भरण्यासाठी पोकलॅण्ड मशिनचा वापर केल्याचे आढळले. या लिलावधारकाने अटी शर्तींचा भंग केला असल्याने लिलाव रद्द करण्याची शिफारस समितीने केली होती. याबाबत समितीच्या अहवालावर लिलावधारक यांना नोटीस बजावून खुलासाही मागविण्यात आला होता. मात्र खुलासा संयुक्तिक नसल्याने जिल्हाधिकार्यांनी उपविभागीय अधिकार्यांच्या अहवालातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन, हा वाळू गट ठेका कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश दिले. तहसीलदारांनी द्यावे लक्ष...या वाळूस्थळातून अवैध उत्खनन व वाहतूक होणार नाही, याची दक्षता तहसीलदारांनी घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. तर कडक कारवाईजिल्ह्यात वाळूस्थळांवर नियम व अटी, शर्तींचा भंग करणार्या लिलावधारकांविरुद्धही कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.