नवी दिल्ली : येत्या चार ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे केंद्र बदलून घेण्याची मुभा केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) उमेदवारांना दिली आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्राचा पर्याय बदलण्याची सोय ‘यूपीएससी’च्या वेबसाईटवर ७ ते १३ जुलै व २० ते २४ जुलै यादरम्यान सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असेल.
उमेदवाराने बदलासाठी ज्या केंद्राचा पर्याय निवडला असेल, तेथील आसनक्षमता आधीच पूर्ण झाली असल्यास उमेदवारास क्षमता शिल्लक असलेल्या अन्य केंद्रांमधून एखादे केंद्र निवडावे लागेल, तसेच उमेदवाराने एखाद्या केंद्रातून त्याचे नाव एकदा काढले की पुन्हा त्या केंद्राची मागणी करता येणार नाही. दूरच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणे अडचणीचे असल्याने केंद्र बदलून देण्याची मागणी अनेकांनी केल्याने आयोगाने हा निर्णय घेतला आहे.नागरी सेवा (मुख्य) परीक्षा व भारतीय वनसेवा (मुख्य) या परीक्षांचे उमेदवारही केंद्र बदलून घेऊ शकतील. परीक्षा केंद्रांमधील हा बदल संबंधित केंद्रात त्यांच्याकडे किती अतिरिक्त उमेदवारांची सोय होऊ शकते यावर अवलंबून असेल व ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर केंद्र बदलून दिले जाईल.