अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच मतदान 9 डिसेंबर रोजी पार पडलं. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान १४ डिसेंबरला होत आहे. या पार्श्वभूमिवर निवडणुकीचा प्रचारही शिगेला पोहचला आहे. भाजपा व काँग्रेसकडून जोरदार प्रचार केला जातो आहे. तसंच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात असताना गुजरात पोलिसांनी भाजप आणि काँग्रेसला जोरदार दणका दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्या अहमदाबादमधील रोड शोला गुजरात पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ट्रॅफिक,कायदा सुव्यवस्थेच्या कारणामुळे रोड शोला गुजरात पोलिसांनी नकार दिला आहे.
वाहतूक कोंडीचं कारण देत गुजरात पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी व्यक्त केली असल्याने नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, असं सांगितलं जातं आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी भाजपा व काँग्रेसकडून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन रॅली आज गुजरातमध्ये आहे. पाटणा, नडियाद व अहमदाबादमध्ये या रॅली आहे. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या चार रॅलीच आयोजन आज गुजरातमध्ये आहे. गांधीनगर, थरद, विरमगाम, सावळी येथे राहुल गांधी यांच्या रॅलींचं नियोजन आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी पार पडलं. निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात 66.75 टक्के मतदान झालं.