ऑनलाइन टीम
वाराणसी,दि. ७ - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुरूवारी वाराणसीत होणा-या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मोदींच्या सभेसाठी ज्या मैदानाची परवानगी मागण्यात आली होती, ते रिकामे नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने सभेला परवानगी नाकारली.
जिल्हा प्रशासनाच्या सांगण्यानुसार, ज्या बेनियाबाग मैदानावर सभा होणार होती, ते मैदान आधीच एका इसमाने बूक केले आहे. त्यामुलेच सभेसाठी हे मैदान देता येणार नसल्याचे प्रसासनाने स्पष्ट केले. भाजपने मात्र याबाबत नाराजी व्यक्त करत हे समाजवादी पक्षाचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.
वाराणसी येथे १२ मे रोजी मतदान होणार असून या जागेवर नरेंद्र मोदींच्या विरोधात आम आदम पक्षाचे अरविंद केजरीवाल व काँग्रेसचे अजय राय निवडणूक लढवत आहेत.
जेटली उद्या करणार धरणे आंदोलन
दरम्यान मोदींना सभेसाठी परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे भाजप नेते अरूण जेटली यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. देशाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार असणा-या व्यक्तीला आपल्याच मतदार संघात प्रचारसभा घेता येत नाही, अशी घटना यापूर्वी कधीच झाली नसेल. हे खेदजनक असून यातूनच मोदींना रोखण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली. या निर्णयाच्या निषेधार्थ आम्ही आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.