कोलकाता - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथपश्चिम बंगालमधील बालुरघाटमधील एका रॅलीला संबोधित करणार होते. मात्र येथील ममता बॅनर्जी सरकारनं योगींच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी दिली नाही. तसंच योगींच्या रॅलीलाही परवानगी नाकारली. मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितले की, पश्चिम बंगाल सरकारने कोणतीही नोटीस न बजावताच रॅलीला परवानगी नाकारली. यामुळे पुन्हा एकदा वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. योगी आदित्यनाथांच्या रॅलीला परवानगी नाकारण्यात आल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे.
हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी परवानगी नाही योगी आदित्यनाथ यांच्या हेलकॉप्टर लँडिंगसाठी पश्चिम बंगाल सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालमधील भाजपाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विजयवर्गीय म्हणालेत की,'लोकशाहीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांना रोखण्याचा अधिकार कुणालादेखील नाही. ममताजींनी योगींच्या सभेला परवानगी नाकारली. त्याच्या या कृत्याची आम्ही निंदा करतो.'
पुढे ते असंही म्हणाले की, तीन दिवसांपासून सभा आणि हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी मागण्यात येत होती. रेल्वे प्रशासनाची जमीन असल्यामुळे सभेसाठी परवानगी देण्यात आली. पण हेलिकॉप्टर लँडिंग परवानगीसाठी वरुन दबाव असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोपही वर्गीय यांनी केला आहे.