नवी दिल्ली : चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या वीज उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत ऊर्जा मंत्रालय अधिक सतर्क झाले आहेत. वीज उपकरणांची आयात करण्यापूर्वी ऊर्जा मंत्रालयाची परवानगी घेणे अत्यावश्यक करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी केली. या उपकरणांची सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने देशाच्या प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चीनमधून भारतावर सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने या हल्ल्यांपासून बचाव कसा करावयाचा याची रणनीती तयार करण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणांतर्गत एक समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा सिंग यांनी केली. वीज हे रणनीतीच्या बाबतीत एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. जर वीजपुरवठा ठप्प झाला तर देशाची अर्थव्यवस्थाच ठप्प होण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे या क्षेत्राबाबत आम्ही अधिक सावधानता बाळगत असल्याचे सिंग यांनी सांगितले.
ज्या उपकरणांची आयात करणे गरजेचे आहे त्यांना परवानगी दिली जाईल, मात्र ही आयात चीन अथवा पाकिस्तानकडून होत असल्यास त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शक्य असेल तर अन्य देशांतून आयातीचा पर्याय वापरावा अशा सूचना मंत्रालयातर्फे संबंधितांनाच दिल्या जात असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. देशाच्या ऊर्जा क्षेत्राला चीन, सिंगापूर आणि रशिया यांसारख्या देशांकडून सायबर हल्ला होण्याची भीती असल्याची माहितीही सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.भारतीय कंपन्या सक्षम बनाव्यात : भार्गवचीनमधून होणारी आयात कमी करावयाची असेल तर भारतीय कंपन्या अधिक सक्षम बनविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी केले. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मागणीसाठी केले जात असलेल्या आंदोलनाबाबत भार्गव म्हणाले की, यासाठी देशातील नागरिकांनी आपल्या देशात बनलेल्या मात्र अधिक किंमत असलेल्या वस्तू खरेदी करण्याची तयारी ठेवली पाहिजे. काही वस्तूंची आयात करणे हे देशासाठी आवश्यक असल्याने त्यांची आयात कायम ठेवावी लागेल, मात्र अन्य वस्तूंबाबत देशी वस्तूंचा पर्याय हा आपण स्वीकारणे गरजेचे आहे. रुपयाचे मूल्य घटत असल्याने आयात होणाºया वस्तू या दिवसेंदिवस महाग होत आहेत. त्यामुळे कारखान्यांना वस्तू आयात करणे हे आता परवडणारे राहिलेले नाही. आपल्याकडे आयात करण्यासाठी जर पर्याय उपलब्ध असतील तर आपण त्यांचा वापर योग्य प्रकारे करण्याची गरज असल्याचे भार्गव यांनी स्पष्ट केले.