Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीस दौऱ्याहून परतल्यानंतर शनिवारी बंगळुरुत इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांना संबोधित केले आणि चंद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीत पोहोचल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे सर्व नेते उपस्थित होते. पालम विमानतळावर पंतप्रधान मोदी भाषण करत असताना एक व्यक्ती बेशुद्ध पडला, यानंतर पंतप्रधानांनी तात्काळ आपल्या टीमला निर्देश दिले.
पंतप्रधान मोदी जेव्हा उपस्थित लोकांना संबोधित करत होते, त्यावेळी तिथे एक व्यक्ती बेशुद्ध पडली. पीएम मोदींची नजर या व्यक्तीवर पडताच त्यांनी आपल्या टीममधील डॉक्टरांना त्या व्यक्तीवर उपचार करण्याचे निर्देश दिले. यानंतर डॉक्टरांच्या टीमने त्या व्यक्तीवर प्रथमोपचार केला. विमानतळावर लोकांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 'हे माझे भाग्य आहे की तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आलात आणि चंद्रयानच्या यशाचा आनंद साजरा केला. यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.'
चंद्रयानाचा उल्लेख पंतप्रधान म्हणाले, 'आज चंद्राच्या ज्या भागावर चंद्रयान-3 लँड करण्यात आले, त्या भागाला शिवशक्ती नाव देण्यात आले आहे. जेव्हा शिवचा उल्लेख निघतो, तेव्हा सर्व शुभ होते आणि शक्तीचा उल्लेख होतो, तेव्हा देशाच्या स्त्री शक्तीची चर्चा होते. शिवचा उल्लेख केला तर हिमालयाचा विचार येतो आणि शक्तीचा विचार केला की कन्याकुमारी विचारात येते, हीच भावना हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रतिबिंबित करण्यासाठी शिवशक्ती हे नाव निश्चित केले आहे.'
G20 साठी लोकांना आवाहन
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत G-20 परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहे, त्यामुळे 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत अनेक उपक्रम होतील. येत्या काही दिवसांत काही गैरसोय होऊ शकते, त्यामुळे मी आजच दिल्लीच्या जनतेची माफी मागतो. आपल्या देशात येणारे पाहुणे आपल्या सर्वांचेच आहेत, त्यांच्यामुळे तुमची काही गैरसोय होईल. म्हणून, एक कुटुंब म्हणून, विनंती आहे की, हा G-20 भव्य-दिव्य, रंगीबेरंगी व्हावा, यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, हा माझा पूर्ण विश्वास आहे.'