Hoax Bomb Threats : गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवांमुळे देशभरात विमान प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या बॉम्बच्या अफवांमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं. मात्र आता या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीची नागपूरपोलिसांनी ओळख पटवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमक्या देणारा व्यक्ती गोंदिया येथील आहे.
विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे सांगत विमान कंपन्यांना धमकावण्याचा प्रकार थांबलेला नाही. २६ ऑक्टोबरपर्यंत १३ दिवसांत देशातील विमान कंपन्यांच्या ३०० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. बहुतेक धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या गेल्याचे समोर आलं होते. तसेच २२ ऑक्टोबर रोजी इंडिगो आणि एअर इंडियाच्या प्रत्येकी १३ फ्लाइटसह सुमारे ५० फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहे. या सततच्या धमक्यांमुळे अनेक उड्डाणांना उशीर होत आहे. त्याचबरोबर विमानतळ आणि इतर आस्थापनांवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मात्र आता नागपूर पोलिसांनी या धमक्या देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली आहे.
जगदीश उईके असे नाव असलेल्या व्यक्तीची नागपूर पोलिसांच्या विशेष शाखेने ओळख पटवली आहे. जगदीशला २०२१ मध्ये एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे उईकेने याआधी दहशतवादावर एक पुस्तकही लिहिले आहे. ओळख पटल्यानंतर जगदीश उईके हा सध्या फरार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात उईके याच्या ईमेलशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
जगदीश उईकेने पंतप्रधान कार्यालय, रेल्वे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एअरलाइन कार्यालये, पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यासह विविध सरकारी संस्थांना ईमेल पाठवले होते. दुसरीकडे, एका गुप्त कोडची माहिती न दिल्यास ठार मारले जाईल, अशी धमकी देणारा ईमेल उईके यांनी पाठवल्यानंतर सोमवारी नागपूर पोलिसांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली होती. उईकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून दहशतवादी धोक्यांबाबत त्याच्याकडे असलेल्या माहितीवर चर्चा करण्याची विनंती केली. उईकेने २१ ऑक्टोबर रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि आरपीएफला पाठवलेल्या ईमेलनंतक रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.
दरम्यान, उईकेला अटक करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे आणि लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिली.