नवी दिल्ली- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार खेळ सुरू आहे. शुक्रवारी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहाच्या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधींच्या या टीकेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा उल्लेख करत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि स्मृती इराणी या दोघांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
राहुल गांधी यांच्यावर स्मृती इराणी यांनी ट्विट करत टीका केली. 'जामिनावर बाहेर असलेला एक व्यक्ती कोर्टाची खिल्ली उडवत आहे. सुरू ठेवा, गुजरात तरीही हारणार आहात. वर्षाच्या शुभेच्छा', असं ट्विट स्मृती इराणी यांनी केला. स्मृती इराणी यांचा रोख नॅशनल हेराल्ड प्रकरणाकडे होता. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना जामीन मिळाला आहे. दोघांवर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे.
अहमदाबाद कोर्टाने 'द वायर' या वेबसाइटला जय शहा यांच्याबद्दल कुठलीही बातमी प्रकाशित न करण्याचे आदेश दिले. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 2014 च्या निवडणुकी दरम्यान मोदींनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला होता. 'ना खाउंगा, ना खाने दूंगा', असं मोदींनी म्हंटलं होते. मोदींच्या या वाक्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी ट्विट केलं. मित्रो,शाह-जादेबद्दल बोलणार नाही, बोलूही देणार नाही', ('मित्रों, शाह-जादे के बारे में ना बोलूंगा, ना बोलने दूंगा), असं म्हणत राहुल गांधीही टीका केली. राहुल गांधींच्या या ट्विटला स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं.
याआधी मंगळवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जय शहा यांना कायदेशीर मदत मिळाल्यावरून भाजपावर टीका केली होती. प्रसिद्ध गाणं 'कोलावेरी डी'चा आधार घेत राहुल गांधींनी टीका केली होती. तसंच राहुल गांधी यांनी देशातील भूकबळीच्या आकडेवारीवर शेरोशायरीमध्ये ट्विट केलं होतं. त्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्याचप्रकारे उत्तर दिलं होतं.