ऑनलाइन लोकमत
गुडगाव, दि. 3 - कुत्र्याचं अपहरण करुन त्यानंतर त्याला मारुन खाल्ल्याची विकृत आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने आपल्या मित्रांसोबत मिळून हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुत्र्याच्या मालकिणीने गुडगावमधील पीपल फॉर अॅनिमल्सकडे (पीएफए) यासंबंधी तक्रार केली. यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पीएफए गुडगावचे अध्यक्ष अमित चौधरी यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार करताना सांगितलं की, "23 एप्रिल रोजी एक महिला आपल्याकडे आली. तिने ब्राऊनी नावाचा आपला कुत्रा चोरी झाला असल्याचं सांगितलं. यानंतर त्याचा शोध घेत असताना संपुर्ण परिसरात पोस्टर्स लावण्यात आले. पोस्टरमध्ये कुत्र्याची माहिती देणा-यास इनाम देण्यात येईल अशी घोषणा केली होती. यानंतर दोघांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की तुमच्या कुत्र्याचं एक तरुण आणि त्याच्या साथीदारांनी तोंड आणि पाय बांधून अपहरण केलं. आणि नंतर त्याला मारुन टाकलं".
सिकंदपूर येथील कम्युनिटी सेंटरजवळ तरुणांनी कुत्र्याचं मांस शिजवून खाल्लं असल्याचा आरोप आहे. गावाजवळच कुत्र्याचं मांस विकणारं एक दुकान असल्याची माहिती आहे. आपल्याकडे आरोपींचा व्हिडीओ आहे ज्यामध्ये ते कुत्र्याचं मांस खाण्याबद्दल बोलत आहेत असा दावा अमित चौधरी यांनी केला आहे. सर्व पुरावे पोलिसांकडे सोपवण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपासाला सुरुवात केली आहे.