ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपूरम, दि. 3 - ज्या पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा होती त्याच पोलिसांच्या मानहानीला कंटाळून बलात्कार पीडितेला आपली तक्रार मागे घ्यावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर पतीच्या मित्रांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तक्रार करायला गेली असता 'बलात्कार होत असताना तुला सर्वात जास्त सुख कोणी दिलं', असा सवाल पोलीस अधिका-याने पीडितेला विचारला. डबिंग आर्टिस्ट भाग्यलक्ष्मी यांनी फेसबूकवर यासंबंधी पोस्ट टाकून राग व्यक्त केला आहे. केरळमध्ये ही घटना घडली आहे.
भाग्यलक्ष्मी यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना घटनेची नोंद घेण्यास भाग पाडलं आहे. लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलं आहे. पीडितेने मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना हे विकृत सत्य सर्वांसमोर आणलं.
'पोलिसांनी माझा मानसिक छळ केला आहे, त्यामुळे मला पोलीस केस करायची नाही. बलात्कारापेक्षाही पोलिसांनी दिलेला वागणूक आणि धमकी असह्य होती', असं पीडित महिलेने सांगितलं आहे. आपल्या पतीसोबत ही महिला मला भेटायला आली तेव्हा तिला अश्रू आवरत नव्हते असं भाग्यलक्ष्मी यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
'पती घरी नसताना त्यांचे मित्र घरी आले होते. माझ्या पतीला रुग्णलयात भर्ती करण्यात आल्याची खोटी बतावणी त्यांनी केली. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सोबत गेली. पण त्यांनी दुस-याच रस्त्याने मला शहराबाहेर नेलं आणि बलात्कार केला. त्यामधील एकाचे राजकीय संबंधदेखील आहेत', अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे. घटनेनंतर महिला इतकी घाबरली होती की तीन महिने आपल्या पतीला सांगितलंदेखील नव्हतं.
पतीने धीर दिल्यानंतर महिलेने पोलीस तक्रार केली. पोलिसांनी चारही आरोपींना बोलावून त्यांच्यासमोर अपमानास्पद प्रश्न विचारले. मात्र पोलिसांकडून होणा-या अपमानामुळे महिलेने आपली तक्रार मागे घेतली.