भयंकर! घरातील पेस्ट कंट्रोलने घेतला 6 वर्षीय मुलीचा जीव; आई-वडीलही रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 10:32 AM2022-08-04T10:32:57+5:302022-08-04T10:33:18+5:30
घरमालकावर निष्काळजीपणा आणि जीवितहानी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
नवी दिल्ली - कीटकनाशकांनी भरलेलं घर सहा वर्षांच्या मुलीसाठी गॅस चेंबर बनल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. सोमवारी सकाळी आई-वडिलांसोबत केरळहून ती घरी परतली होती. काही वेळाने जेव्हा ती आई-वडिलांसोबत झोपायला जात होती, तेव्हा तिचा घसा खवखवायला सुरुवात झाली आणि खाज सुटू लागली. याबाबत तिने पालकांना सांगितल्यावर आम्हालाही असंच होतं असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांना खाज येत होती आणि शरीरात काहीतरी टोचल्यासारखं वाटत होतं. यानंतर सर्वांना उलटी होऊ लागली
साडेअकरा वाजताच्या सुमारास तिघेही शेजारीच असलेल्या रुग्णालयात दाखल झाले. मात्र, दुपारपर्यंत या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला आणि घरातील एकुलती एक मुलगी आई-वडिलांनी गमावली. मुलीचे वडिलही बराच वेळ बेशुद्धच राहिले. नक्की काय झालं, हे कोणालाच समजत नव्हतं. TOI च्या बातमीनुसार, नंतर मुलीच्या मावशीने सर्व गोष्टी सांगितल्या. एमबीए पदवीधर विनोद कुमार बंगळुरूमधील एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करतात. पत्नी निशा आणि मुलगी आहानासोबत ते नुकतंच केरळहून परतले होते. 28 जुलै रोजी ते केरळला गेले होते.
घरमालकाकडे याआधी त्यांनी घरात झुरळ आणि किडे असल्याची तक्रार केली होती आणि कीटकनाशक फवारणी करण्यास सांगितलं होतं. याच कारणामुळे ते आपल्या कुटुंबीयांसह केरळला गेले होते. घरमालकानेही होकार दिला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. घरातील कीटकनाशकांच्या वापरानेच चिमुरडीचा जीव घेतला. दोन्ही पालक अजूनही धक्क्यात आहेत. घरमालकावर निष्काळजीपणा आणि जीवितहानी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. घरमालकाने सांगितलं की, त्याच्या घरात जे रसायन होतं तेच रसायन त्याने वापरले.
हे रसायन 100 रुपयांना 100 मिली मिळतं. हे रसायन सामान्यतः कापूस, भात, तेलबिया किंवा इतर लागवडीच्या पिकांमधून बोंडअळी, सुरवंट, लीफमिनर यांसारखे कीटक काढून टाकण्यासाठी वापरले जाते. घरमालकाने जाणूनबुजून निष्काळजीपणा तर केला नाही ना, याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय विनोद कुमार यांना पेस्ट कंट्रोलनंतर किती दिवस घराबाहेर राहावे लागेल याची माहिती देण्यात आली होती का, याचाही शोध घेतला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.