अलाहाबाद/ लखनौ : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची विनंती करणारी याचिका अलाहाबादचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सुशीलकुमार यांनी बुधवारी दाखल करून घेतली आहे. देशविरोधी घोषणा देणाऱ्या जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईला राहुल गांधी यांनी विरोध केल्याचे कारण याचिकाकर्त्याने दिले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या वादाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही न्यायालयात खेचण्याची तयारी सुरू झाली आहे.वकील सुशीलकुमार मिश्रा यांंची याचिका दाखल करवून घेताना कनिष्ठ न्यायालयाने १ मार्च रोजी कलम २०० नुसार निवेदन नोंदवून घेण्याचा आदेश दिला आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या हा दोषी देशद्रोही असून त्याच्यावर १२४ ए नुसार खटला दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी विद्यापीठ परिसरात जाऊन नारेबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन करणारे विधान केले. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहासंबंधी कलम १२४, १२४ ए , ६०० आणि ६११ नुसार खटला भरला जावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. (वृत्तसंस्था)
देशद्रोहाच्या खटल्यासाठी राहुल गांधींविरुद्ध याचिका
By admin | Published: February 18, 2016 6:35 AM