नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत बुरखा आणि चेहरे झाकणाऱ्या इतर गोष्टींवर बंदीची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दिल्लीच्या सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे येथील सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि चेहरे झाकणाऱ्या इतर गोष्टींवर बंदी घालावी, अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली होती. तथापि, न्यायमूर्ती जी. रोहिणी आणि न्यायमूर्ती संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठाने ही याचिका जनहिताची नाही असे सांगत फेटाळून लावली.हा जर धोरणात्मक निर्णय असेल, तर सरकार त्यावर विचार करील. आम्ही कलम २२६ अंतर्गत या याचिकेवर कशी काय सुनावणी करू शकतो, असा सवाल न्यायमूर्तीद्वयांनी केला. या याचिकेत हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे ती फेटाळण्यात येत आहे. दहशतवादी कारवायांचा धोका असल्यामुळे राजधानीतील वारसा स्थळे, सरकारी इमारती, वाहतूक यासारख्या सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि चेहरा झाकणाऱ्या इतर गोष्टी वापरण्यावर बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. चेहरा आणि संपूर्ण शरीर झाकणाऱ्या वस्त्र प्रावरणांचा उपयोग करणे हा सुरक्षेशी संबंधित गंभीर मुद्दा असून त्यामुळे नागरिकांना धोका उत्पन्न होतो. हे घटनेच्या कलम २१ चे (जीवन आणि वैयक्तिक सवलत) उल्लंघन आहे, असा आरोप सरदार रवी रंजनसिंग यांच्या याचिकेत करण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बुरख्यावर बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळली
By admin | Published: November 16, 2016 1:31 AM