सुनील चावके -
नवी दिल्ली : शिवसेनेतून फुटून निघालेल्या १६ आमदारांची अपात्रता तसेच निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची प्रतीक्षा वाढली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेतून फुटून निघालेल्या ४० पैकी १६ आमदारांविरुद्ध दाखल करण्यात अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीही लांबणीवर पडली आहे. या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा, असा अर्ज उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.
आणखी प्रतीक्षा...- शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पीठाने दि. ३१ जुलै रोजी सुनावणी करण्याचे ठरविले होते.
- पण सोमवारी या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणीसाठी नवी तारीख ठरू शकली नाही. - सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे कलम ३७० रद्द करण्याच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार असल्यामुळे आता या दोन्ही याचिकांवरील सुनावणी लगेच होण्याची शक्यता नसून किमान दोन ते चार आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.